परभणीच्या गंगाखेड शहरातील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Assembly elections) : विधानसभा निवडणूकीची टपाली मतदान प्रक्रिया सुरु असल्याने शहरात गस्तीवर असलेल्या गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बाहेर जिल्ह्यातील चार चाकी वाहनातून तीस लाख रुपये रोख रक्कम जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी अस्त्राचा वापर होत असल्याची चर्चा गंगाखेड विधानसभा मतदार संघात होत असल्याने व रविवार १० नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या कडेला नोटांच्या बंडलचे कव्हर आढळल्याचे वृत्त दैनिक देशोन्नती ने सोमवार ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्याने तसेच गेल्या दोन दिवसांपासून ८५ वर्षाच्या पेक्षा अधिक वय असलेले मतदारांसहअपंग मतदारांचे घरोघरी जाऊन मतदान घेण्याची व टपाली मतदानाची प्रक्रिया सुरु असल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार ११ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, डि.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस शिपाई परसराम परचेवाड, राम पडघन आदींचे पथक शहरात गस्तीवर असतांना बाहेर जिल्ह्यातील एका चार चाकी वाहनात मोठी रक्कम असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांना मिळताच त्यांनी सपोनि आदित्य लोणीकर व डि. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख यांना याची माहिती दिली. तेंव्हा सदर पथकाने दुपारी अंदाजे २:३० ते ३ वाजे दरम्यान डॉक्टर लाईन परिसरात आढळून आलेले नांदेड जिल्ह्यातील चार चाकी वाहन संशयावरून पोलीस ठाण्यात आणत याबाबतची माहिती निवडणूक विभाग व एफ.एस.टी. पथकाला दिली. एफ.एस.टी. पथक प्रमुख समाधान पवार, ग्रामसेवक राहुल रेंगे, पो. शि. नलबले, फोटोग्राफर मुरकुटे, शासकीय पंच महादेव काडवदे, अविनाश राठोड यांच्या समक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रोख तीस लाख रुपये (५०० रुपये दराच्या नोटांचे ६० बंडल) एव्हढी मोठी रक्कम मिळून आल्याने याचा पंचनामा करून चार चाकी वाहनात सापडलेली रक्कम गंगाखेड पोलीसांनी जप्त केली. या घटनेने शहरात मात्र चांगलीच खळबळ उडाली होती.
व्यवसायासाठी बँकेतून काढली होती रक्कम
गंगाखेड पोलीसांनी चार चाकी वाहनातून जप्त केलेली ३० लाख रुपये ही रक्कम व्यवसायाची असून जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे पैसे देण्यासाठी गंगाखेड शहरातील बँकेतून ही रक्कम काढल्याचे सदर व्यापाऱ्याने पोलीसांना सांगितले आहे.