नगर परिषद कार्यालयास ठोकले कुलूप
गंगाखेड (Gangakhed Bandh) : शहरातील मारोती मंदिर ते परभणी रस्त्याकडे (संत जनाबाई कमान) जाणाऱ्या डिपी रस्त्यावर असलेल्या भैरू महाराज समाधी स्थळावरून प्रशासनाने बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी पोलीस बंदोबस्तात मलाबा काढून रस्त्याचे काम सुरू केल्याने संतप्त झालेल्या हिंदू संघटना व तरुणांनी स्थानिक आमदार व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत अचानक व्यापार बंद (Gangakhed Bandh) केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
व्यापार पेठेत काही काळ तणावपूर्ण स्थिती
याबाबत अधिक माहिती अशी की, (Gangakhed Bandh) गंगाखेड शहरातील मोठा मारोती मंदिर ते परभणी ( संत जनाबाई कमान) रस्त्याकडे जाणाऱ्या डिपी रस्त्याच्या कामा दरम्यान मारोती मंदिर परिसरात असलेली भैरू महाराज यांची समाधी नगर परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडल्यावरून हिंदू संघटनांनी रस्त्याचे काम बंद पाडले होते. मात्र गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गंगाखेड शहरात येणार असल्यामुळे बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात या रस्त्याचे काम सुरू केल्याने अर्जुन पूरनाळे, डॉ. सुभाष कदम, मोहन गित्ते, आर. डी. भोसले, अंकुश मदनवाड, अभिजित पूरनाळे, जितेश गोरे, ज्ञानेश्वर डाके, प्रशांत फड, संजय अनावडे, माणिक भोकरे, विष्णू अनावडे आदी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व तरुणांनी भैरु महाराज समाधी स्थळाकडे धाव घेतली.
तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने या सर्वांनी व्यापार पेठेत जमा होऊन जागे व्हा जागे व्हा हिंदूनो जागे व्हा अशा घोषणा देत व्यापार पेठ बंद करण्याचे आवाहन करत आपला मोर्चा नगर परीषद कार्यालयात आणला येथे ठिय्या आंदोलन करून स्थानिक आमदार व नगर परिषद, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणा देत प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. व आपला मोर्चा पुन्हा भैरू महाराज समाधी स्थळाकडे वळविला तेथे डीपी रस्त्यावर ठाण मांडून घोषणाबाजी केल्यामुळे शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गांगाखेड शहरातील डीपी रस्त्यावरील कामा दरम्यान हिंदु संघटनांच्या पदाधिकारी व तरुणांनी व्यापार पेठ बंद (Gangakhed Bandh) पाडून समाधी स्थळावर ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार उषाकिरण श्रंगारे यांनी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या पदाधिकारी व तरुणांनी त्यांचे काही एक न ऐकता ठिय्या आंदोलन सुरूच ठेवत समाधी स्थळावर आरती केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.