गंगाखेड (Gangakhed Bus) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अंबाजोगाई येथील सभेला गंगाखेड आगारातील बसेस (Gangakhed Bus) पाठविल्याने ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात आली. यामुळे काही प्रमाणात सुरू असलेल्या बसमध्ये झालेल्या गर्दीमुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे चित्र बस स्थानकावर पहावयास मिळाले.
पंतप्रधान मोदी यांच्या सभेला बसेस पाठविल्याचा परिणाम
लोकसभा निवडणुक (LokSabha Elections) प्रचाराच्या अनुषंगाने दिनांक ७ मे मंगळवार रोजी अंबाजोगाई येथे भाजपा महायुतीच्या उमेदवार प्रचारात संपन्न होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जाहीर सभेसाठी (Gangakhed Bus) गंगाखेड आगारातील बसेस पाठविण्यात आल्यामुळे गंगाखेड आगारातून तालुक्यातील झोला, पिंप्री, मसला, खळी, चिंचटाकळी, गौडगाव, मैराळसावंगी, महातपुरी, भिसेगाव, खडका, सायखेडा, शेळगाव मार्गे सोनपेठ, अरबुजवाडी, गुंजेगाव, सुप्पा, पिंपळदरी, वाघदरी आदी गावांसह किनगाव आदी ग्रामीण भागातून जवळपासच्या तालुक्यात जाणारी बस सेवा बंद ठेवण्यात आली.
लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या रोडावली
कुठलीही पूर्वसूचना न देता गंगाखेड आगारातून ग्रामीण भागात जाणारी बस (Gangakhed Bus) सेवा बंद ठेवण्यात आल्याने बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर, बीड आगारातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या रोडावल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा तासोंतास बसची वाट पाहत बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले. आग ओकनाऱ्या सूर्याच्या रखरखत्या उन्हात प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाल्याचे चित्र बस स्थानक परिसरात पहावयास मिळाले. (LokSabha Elections) लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी बसेस गेल्याने ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची पूर्व सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गंगाखेड आगारातील आगार व्यवस्थापक, आगार प्रमुख यांनी सूचना फलकावर न लावल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात होता.
सभेसाठी दहा बसेस
गंगाखेड बस (Gangakhed Bus) स्थानकातून ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद असल्याबाबत होत असलेल्या अनाऊसमेंट संबंधी माहिती घेण्यासाठी प्रभारी आगार प्रमुख आर. व्ही. हडबे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अंबाजोगाई येथील सभेसाठी १० बसेस गेल्याची माहिती देत ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद असल्याचे त्यांनी ‘दैनिक देशोन्नती’ शी बोलताना सांगितले.