परभणी/गंगाखेड (Gangakhed City Council) : शहरातील जनावरांच्या शनिवार बाजारात दाखला बनवितांना ठेकेदाराकडून होणारी शेतकरी व व्यापाऱ्यांची लुट थांबवावी अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक यांच्यासह जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गंगाखेड शहरात दर आठवड्याला शनिवार रोजी भरणाऱ्या जनावरांच्या शनिवार बाजारात कुठल्याही सुविधा उपलब्ध नसतांना दाखला ठेकेदाराकडून जनावरांचा जमानती दाखला ६० रुपयांऐवजी २०० रुपयांत व साधा दाखला ५० रुपयांऐवजी १५० रुपयांत अव्वाच्या सव्वा चढ्या दराने देऊन मनमानी कारभार करत शेतकरी बांधवांसह व्यापाऱ्यांची प्रचंड प्रमाणात लुट सुरू केली असल्याची तक्रार नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्याकडे करत मनमानी कारभार सुरु केला असून मुख्याधिकारी यांनी जाय मौक्यावर जाऊन पंचनामा करून जनावरांच्या जमानती व साध्या दाखल्यासाठी नगर परीषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराचे फलक शनिवार बाजारात लाऊन शेतकरी व व्यापाऱ्यांची लूट तात्काळ थांबवावी व सुविधा उपलब्ध करून देत दाखला ठेकेदाराविरूद्ध कारवाई करत ठेका रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर गणेश माधव मुंडे यांच्यासह गंगाखेड शहर, धारखेड, खळी, जवळा, सायळा, गुंजेगाव, बोर्डा, इसाद, खोकलेवाडी, मालेवाडी, पालम, सोनपेठ, शेळगाव, सिरसाळा, पातुड, परळी, मांडवा, दैठणा, परभणी, नांदेड, हाडोळती, अहमदपूर, वसमत, पोहनेर, अंधोरी, धर्मापुरी, कंधार, ताडकळस, साळापुरी, चुकार पिंपरी आदी ठिकाणच्या बहुसंख्य शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यांच्यासह नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर यांना ही देण्यात आल्या आहेत.