परभणीतील गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी पुलाजवळील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime Case) : तालुक्यातील खळी पाटी पुलाजवळील हॉटेलमध्ये बसलेल्या एका इसमावर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या (Gangakhed Crime Case) पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अवघ्या दिड तासात आरोपीस ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.
अवघ्या दिड तासात आरोपी पोलिसांचा ताब्यात
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी गोदावरी नदी पुलाजवळील एका हॉटेलमध्ये प्रविण रुकमाजी कौडकर वय ५० वर्ष रा. यज्ञभूमी परिसर गंगाखेड हे मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी बसलेले असतांना दुपारी २ वाजेच्या सुमारास हातात कोयता घेऊन तिथे आलेल्या हनुमान रामभाऊ पवार याने त्यांच्या जवळ येऊन जुन्या भांडणाच्या करणावरून प्रविण कौडकर यांना तु खूप माजलास असे म्हणून शिवीगाळ करून तु माझे वाटुळ केले असे म्हणत हातातील कोयत्याने प्रविण कौडकर यांच्या हातावर, मानेवर, डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. जिव वाचविण्यासाठी प्रविण कौडकर गंगाखेड रस्त्याने पळत असतांना त्यांच्या मागे कोयता घेऊन पाठलाग करणाऱ्या हनुमान पवार याने सी.डब्ल्यू.सी. ऑफिस समोरील झोपडीत गेलेल्या प्रविण कौडकर यांच्यावर तेथे ही कोयत्याने वार केले.
कोयत्याने केलेल्या हल्ल्यात रक्त बंबाळ होऊन प्रविण कौडकर खाली कोसळताच हनुमान पवार याने घटनास्थळावरून पळ काढला. एका इसमावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती समजताच (Gangakhed Crime Case) गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, जमादार दिपक व्हावळे, चालक पांढरे आदिनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या हल्ल्यात प्रविण कौडकर यांचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपाजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी मयत प्रविण कौडकर यांचा मुलगा साईप्रसाद कौडकर यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरु होती.
परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक घटनास्थळी
गंगाखेड परभणी रस्त्यावर कोयत्याने वार करून एका इसमाचा खून (Gangakhed Crime Case) झाल्याची माहिती समजताच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सपोनि सिद्धार्थ इंगळे, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, जमादार दिपक व्हावळे यांना तपासासंबधी सूचना केल्या.
गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपी केला गजाआड
बुधवार रोजी दुपारी अंदाजे २ वाजेच्या सुमारास कोयत्याने वार करून प्रविण कौडकर यांचा खून करून फरार झालेला इसम हनुमान पवार हा गंगाखेड शहरात असल्याची कुणकुण लागताच उपविभागीय पोलीस अधिकरी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, जमादार शिंदे, जमादार संजय साळवे, अनंत डोंगरे, दत्तात्रय चव्हाण यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हा दाखल होण्यापूर्वी हनुमान पवार यास ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.
माहिती मिळताच स्थागुशाचे पथक घटनास्थळी
खळी शेत शिवारात नामदेव उर्फ हनुमान रामभाऊ पवार यांने अनैतिक संबंधाचे कारणावरून प्रवीण रुखमाजी कौडकर रा. यज्ञ भूमी गंगाखेड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची माहिती समजताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह स्था.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, दिलीप निलपत्रेवार,उत्तम हनवते यांनी व अंगुली मुद्रा पथक, श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.