परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : पेट्रोल पंप सुरळीत चालवायचा असेल तर दहा हजार द्या अशी मागणी करत दुचाकीत टाकलेल्या पेट्रोलचे पैसे न देता पंप फुकुन देण्याची धमकी देत व्यवस्थापकाला मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी पोलीसांनी लहुजी नगर परिसरात छापा मारून केलेल्या दोन कार्यवाहीत धारदार शस्त्र जप्त करून दोघांविरुद्ध (Gangakhed Crime) गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांच्या छापेमारी धारदार शस्त्र जप्त
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरापासून जवळच गंगाखेड परभणी रस्त्यावर असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर दि. २८ ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एमएच २२ बीबी ७८२८ क्रमांकाच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या राम रुस्तुम गायकवाड व लंकेश बंडू बल्लाळ रा. लहुजी नगर गंगाखेड यांनी दुचाकीत टाकलेल्या पेट्रोलचे पैसे देण्यावरून पंपावरील कामगारांशी वाद घातला यावेळी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक बालाजी माने यांनी मध्यस्थी करत पेट्रोलचे पैसे देण्यास सांगत येथे सिगारेट ओढू नका पंपा बाहेर जावून सिगारेट ओढा असे सांगितले असता त्याने मी गंगाखेडचा आहे माझ्या मागे भरपूर मुले आहेत.
पंप सुरळीत चालवायचा असेल तर मला दहा हजार द्यावे लागतील असे म्हटल्याने कशाचे दहा हजार रुपये द्यायचे तुम्ही यापूर्वी ही असेच पेट्रोल टाकून पैसे न देता निघून गेल्याचे व्यवस्थापक बालाजी माने यांनी म्हणताच मला पैसे मागतो का म्हणून एकाने माने यांना थापडा मारत कॉलर पकडून ढकलून देत जिवे मारण्याची धमकी दिली तर दुसऱ्याने दगड उचलून डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला असता पंपावरील कामगारांनी राम गायकवाड यास पकडून ठेवत पंप मालक अभिषेक चौधरी यांना बोलाविले तेंव्हा त्याने अभिषेक चौधरी यांना ही शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर जाताच त्यास पोलीसांच्या स्वाधीन केल्याने सुमारे एक तासानंतर दिपक जाधव, बॉबी बालाजी बोबडे, आदित्य गायकवाड, रामेश्वर गायकवाड, दत्ता जाधव, कृष्णा गायकवाड आदींनी बेकायदेशीरपणे हातात काठ्या व रॉड घेवून पंपाजवळ येवून दहशत निर्माण केल्याची फिर्याद बालाजी माने यांनी दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Gangakhed Crime) करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल (Gangakhed Crime) होत असताना लहुजी नगर परिसरातील गोविंद नागु पवार व सचिन त्र्यंबक जाधव यांच्या घरात बेकायदेशीर विनापरवाना धारदार शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पोलीस शिपाई रामेश्वर पडघन, धनंजय कनके, मपोशि गंगासागर पौळ आदींच्या पथकाने रात्री ८ ते ९ वाजे दरम्यान सचिन त्र्यंबक जाधव व गोविंद नागू पवार यांच्या घरी छापा मारून दोन तलवार, दोन खंजीर असे धारदार शस्त्र जप्त करून दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. या तिन्ही गुन्ह्याचा तपास अनुक्रमे पोलीस उप व्यंकट गंगलवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान पठाण व जमादार संभाजी शिंदे हे करीत आहेत.