पहाटेच्या सुमारास झालेल्या कार्यवाहीत पाच गुन्हे दाखल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : शहरातील लहुजी नगर व महात्मा फुले नगर परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री (illegal Gavathi Hatbhatti) करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करत येथे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर रविवार रोजी पहाटे गंगाखेड पोलीसांनी छापेमारी करून अंदाजे ५४ हजार रुपयांची गावठी हातभट्टी दारू नष्ट केली आहे.
गंगाखेड शहरातील लहुजी नगर, महात्मा फुले नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी हातभट्टी व देशी दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्याने दि. ४ ऑगस्ट रविवार रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी शिंगणवाड, सपोनि आदित्य लोणीकर, जमादार संतोष व्यवहारे, सुग्रीव सावंत, पो.शि. गोविंद कदम, प्रकाश कांबळे, मपोशि स्नेहल जिंकलवाड आदींनी चार ठिकाणी व स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि पांडुरंग भारती, राहुल परसोडे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवड, केंद्रे आदींच्या पथकाने एक अशा एकूण पाच ठिकाणी छापेमारी (Gangakhed Crime) करून लहुजी नगर परिसरातील अमर सूर्यकांत जाधव यांच्याकडून ३३६० रुपये किंमतीची देशी दारू जप्त करून गुन्हा दाखल केला.
महात्मा फुले नगर परिसरात जनार्धन उत्तमराव गायकवाड यांच्या राहत्या घरी छापा मारून २० हजार रुपये किंमतीची २०० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. तिसऱ्या कार्यवाहीत रुस्तुम गायकवाड यांच्या घरी छापा मारून राजेश मनोहर जाधव रा. बाभळगाव फाटा याच्या ताब्यातून ३ हजार रुपये किंमतीची ३० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. चौथ्या कार्यवाहीत सविता सुनील चिकाटे यांच्या घरी छापा मारून २० हजार रुपये किंमतीची २०० लिटर गावठी हातभट्टी दारू व ७ हजार रुपये किंमतीचे रसायन जप्त करून जागीच नष्ट केले.
पाचव्या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि पांडुरंग भारती यांच्या पथकाने लक्ष्मण गणपत जाधव यांच्या लहुजी नगर परिसरातील घरावर छापा मारून ४ हजार रुपये किंमतीची ४० लिटर हातभट्टी दारू नष्ट केली. रविवार रोजीच्या पहाटे ६ वाजेपासून ते सकाळी ७:३० वाजे दरम्यान केलेल्या पाच कार्यवाह्यंत एकूण ५४ हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू नष्ट करून देशी दारू जप्त करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या (Gangakhed Crime) गुन्ह्यांचा तपास सपोनि शिवाजी शिंगणवाड, बिट जमादार मारोती माहोरे, मुंजाजी वाघमारे हे करीत आहेत.