परभणीच्या देवठाणा गावाजवळ कारवाई
११ जणांविरुध्द गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : पूर्णा तालुक्यातील देवठाणा गावाजवळ गोदावरी नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपशावर शनिवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाड टाकुन तराफे, पावडे, टोपले आणि वाळू मिळून ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात ११ जणांविरुध्द (Gangakhed Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी येथील स्थागुशाचे पो.नि. अशोक घोरबांड यांच्या आदेशावरुन सपोनि. पांडुरंग भारती, पोलिस अंमलदार लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, परसराम गायकवाड, पौळ, चव्हाण, दिलीप निलपत्रेवार, उत्तम हनवते यांच्या पथकाने शनिवारी रात्री गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना देवठाणा गावाजळून वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातुन सचिन रमेश जोगदंड हा त्याच्या सोबत असलेल्या अन्य दहा अनोळखी इसमांच्या मदतीने गोदावरी नदी पात्रातुन अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची गोपणीय माहिती मिळाली. या (Gangakhed Crime) माहितीवरुन छापा टाकण्यात आला.
वाळू माफियांनी काढला पळ
पोलिसांच्या पथकाला पाहुन वाळू उपसा करणार्या इसमांनी आपल्या जवळचे साहित्य जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या कारवाईत २० ब्रास वाळूसह ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सपोनि. सिध्दार्थ इंगळे करत आहेत.