३५ ब्रास वाळूसह साहित्य जप्त
परभणीतील मसला परिसरात महसूल प्रशासनाची कारवाई
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : गोदावरी नदी पात्रातुन अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या तीन छावण्या व एक तराफा नष्ट करत तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने मसला शिवारातून गुरुवार १९ डिसेंबर रोजी ३५ ब्रास वाळूसह फावडे, टोपले आदी साहित्य जप्त केले आहे.
वारंवार कारवाई करून सुद्धा गोदावरी नदी पात्रातून मसला शिवारात होत असलेला अवैध वाळू उपसा थांबत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, नायब तहसीलदार आशोक केंद्रे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, महसूल सहाय्यक गणेश सोडगीर, तलाठी संतोष इप्पर, शिपाई अर्जुन आघाव, पोलीस पाटिल शिंदे, सरपंच शिंदे आदींनी गुरुवार १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत मसला शिवारात गोदावरी नदी पात्रात विविध ठिकाणी धडक कारवाई करत वाळू उपसा करण्यासाठी असलेला एक तराफा तसेच गोदावरी नदी काठावरील तीन छावण्या नष्ट करून अंदाजे ३५ ब्रास वाळूचे चार साठे, १५ फावडे, टोपले आदी साहित्य जप्त केले आहे. नदी काठावर जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात आणून जमा करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.