तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांची कारवाई
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी नदी काठावरील गावात नदी पात्रातून तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार उषाकिरण शृंगारे व त्यांच्या पथकाने शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजे दरम्यान केलेल्या कारवाईत तीन तराफे जाळून नष्ट केले आहे.
गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धारासूर ते मसला दरम्यान (Gangakhed Crime) गंगाखेड शहरासह तालुक्यातील अनेक गावातून रात्री अपरात्री तराफे, ट्रॅक्टर व गदर्भाच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्याने शुक्रवार १३ डिसेंबर सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी नायब तहसिलदार अशोक केंद्रे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी संतोष इप्पर, तहसिल कार्यालयातील महसूल कर्मचारी गणेश सोडगीर, कोतवाल रामेश्वर चातरवाड, गोविंद मैड, राहुल उबाडे आदींना सोबत घेऊन प्रथम पिंप्री, मसला शिवारातील गोदावरी नदी पात्राला भेट दिली असता तेथे वाळू उपसा करण्यासाठी नदी काठावर ठेवलेले दोन तराफे मिळून आले तर नागठाणा शिवारातील गोदावरी नदी पात्रात एक असे एकूण तीन तराफे मिळून आल्याने तिन्ही तराफे जागीच जाळून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली.
गोदावरी नदी पात्राकडे तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच कारवाई होण्यापूर्वीच वाळू माफियांनी गोदावरी नदी पात्र परिसरातून धूम ठोकल्याने या (Gangakhed Crime) कारवाई दरम्यान एक ही वाळू माफिया महसूल प्रशासनाच्या हाती लागला नाही.