परभणी/गंगाखेड (Gangakhed death) : पाणी आणण्यासाठी गेलेल्या पन्नास वर्षीय महिलेस विजेच्या खांबाजवळील ताण तारातून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील अकोली येथील बालासाहेब मुंजाजी पोले वय ५५ वर्ष यांचे कुटुंब शेतात आखाड्यावर राहत आहे. सायंकाळी त्यांच्या पत्नी शिवनंदा बालासाहेब पोले वय ५० वर्ष या पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या असता तिथे असलेल्या विजेच्या खांबाजवळील ताण तारातून विजेचा धक्का लागल्याने (Gangakhed death) त्या जागीच कोसळल्या. ही बाब समजताच बालासाहेब पोले यांनी शेत शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यु झाल्याच्या घटनेची मिळताच (Gangakhed Police) पोलीस जमादार मारोती माहोरे, पो. शि. परसराम परचेवाड यांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी बालासाहेब पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास बिट जमादार संतोष व्यवहारे हे करीत आहेत.