परभणी/गंगाखेड (Gangakhed Death) : बिडी पेटवितांना लुगड्याने पेट घेतल्याने गंभीररित्या जळालेल्या ९० वर्षीय वृद्ध महिलेचा दि. ५ ऑगस्ट सोमवार रोजी उपचारा दरम्यान मृत्यु (Old man Death) झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील प्रयागबाई बाबुराव काळे वय ९० वर्ष यांना बिडी ओढण्याची सवय असल्याने दि. २ ऑगस्ट रोजी बिडी पेटवितांना पेटती काडी हातातून सुटून पडल्याने त्यांच्या लुगड्याने पेट घेतला. प्रयागबाई काळे यांचा आवाज ऐकून धावत आलेल्या हनुमान काळे यांनी आग विझवून त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार करून परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असता दि. ५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची खबर बालाजी बाबुराव काळे यांनी दिल्यावरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Old man Death) नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास जमादार मुंजाजी वाघमारे हे करीत आहेत.