पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याचे दिले होते बनावट आदेश
परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याचे बनावट नियुक्ती आदेश देऊन फसवणूक करणाऱ्या टोळी विरुद्ध (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात काही संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पोलीस भरतीचा (Police Recruitment) सराव करणाऱ्या गंगाखेड जायकवाडी वसाहतीत राहणाऱ्या मुक्ता कोंडीराम मुंडे वय २५ वर्ष या मार्च २०२३ मध्ये शहरातील इदगाह मैदानावर नियमितपणे पोलीस भरतीचा सराव करीत असताना यावेळी येथे सराव करणाऱ्या माहेरकडील सुरेखा भागवत फड यांची भेट झाली. दोन्हीचे माहेर एकच असल्याने व दोघीही पोलीस भरतीचा सराव एकत्र करीत असल्यामुळे त्यांची मैत्री आणखीन घट्ट झाली व सुरेखा फड हिचा मावस भाऊ महेश त्र्यंबक भताने याच्या पुणे ग्रामीण पोलीस दलात खूप ओळखी असून त्यांच्यामार्फत आपले पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे म्हणत सुरेखा फड हिने महेश भताने यास गंगाखेड येथील घरी बोलावून घेत मुक्ता मुंडे व तिच्या पतीस विश्वासात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून वेळोवेळी रोख व फोन पे च्या माध्यमातून १२ लाख ५० हजार रुपये घेऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याचे नियुक्तीचे खोटे आदेश बनवून त्यावर पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्या खऱ्या असल्याचे भासवून त्या आधारे महेश त्र्यंबक भताने व गणपत मच्छिंद्र डोंगरे यांनी दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी पुणे येथील भिगवण येथे फिर्यादी मुक्ता मुंडे यांच्यासह सुरेखा फड, उद्धव रामराव मुंडे रा. वडवणी तालुका गंगाखेड, सागर पाटील अकलूज, बळीराम सोळंके यांना बोलावून वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी न करता डॉक्टरांना मॅनेज केल्याचे सांगत वैद्यकीय तपासणी केल्याचे भासवून लवकरच पगार सुरू होईल त्यासाठी लागणारे कागदपत्र घेतले.
मात्र बरेच दिवस झालेतरी जॉयनिंग लेटर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मुक्ता मुंडे यांनी पैसे परत मागितले असता सुरेखा फड यांचा भाऊ प्रदीप मुंडे याने आता माझ्या बहिणीला पैसे मागितले तर तुमचे रस्त्यावरून फिरणे बंद करीन व तुम्हाला जिवे मारीन अशी धमकी दिल्याने फिर्यादी मुक्ता मुंडे यांनी गंगाखेड पोलीस ठाणे गाठीत पोलीस भरतीचे आमिष दाखवून पैसे घेऊन फिर्यादी मुक्ता मुंडे यांच्या प्रमाणेच त्यांच्या सोबतच्या उद्धव रामराव मुंडे रा. वडवणी तालुका गंगाखेड, सागर पाटील अकलूज, बळीराम सोळंके यांना देखील नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ही पैसे घेऊन त्यांना देखील पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याचे खोट्या स्वाक्षरीचे बनावट आदेश देऊन फसवणूक केल्याची फिर्याद दिल्याने १) महेश त्र्यंबक भताने रा. गोडाळा ता. अहमदपूर, २) गणपत मच्छिंद्र डोंगरे रा. रोहिणा ता. चाकुर, ३) भागवत दगडोबा फड, ४) सुरेखा भागवत फड दोघे रा. जायकवाडी वसाहत गंगाखेड, ५) प्रदीप सुनील मुंडे रा. संत जनाबाई नगर गंगाखेड अशा एकूण पाच जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात दि. १९ सप्टेंबर रोजीच्या पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली (Gangakhed Police) सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.
संशयीत आरोपी ताब्यात
पैसे घेऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस भरतीचे बनावट नियुकी आदेश देणाऱ्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल होताच. यातील संशयितांना (Gangakhed Police) पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना दिली.