साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : रात्र गस्तीवर असलेल्या गंगाखेड पोलीसांनी रोजी रात्री ११:३५ वाजेच्या सुमारास पन्नास हजार रुपयांच्या देशी, विदेशी दारूसह स्विफ्ट कार ताब्यात घेऊन साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गिते, चालक सुग्रीव सावंत हे दि. १४ स्पटेंबर शनिवार रोजी रात्री डिव्हिजन चेकिंगसाठी निघाले असता शहरातील परळी नाका परिसरात ओम नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये देशी दारूचे बॉक्स असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने ११:३५ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक राम गिते, चालक सुग्रीव सावंत हे ओम नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेले असता तेथे एमएच १२ ईजी ७३९७ क्रमांकाची कार थांबलेली दिसली पोलीस आल्याचे पाहून कारजवळ असलेल्या दोन अनोळखी इसमांनी कार जागीच सोडून पळ काढला तेंव्हा त्यांचा पाठलाग केला.
अंधाराचा फायदा घेऊन ते फरार झाल्याने (Gangakhed Police) सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पैठणे, पो. शि. अनंत डोंगरे, गोविंद कदम, शंकर गयाळ, चालक सतिश पांढरे यांना मदतीसाठी बोलावून पंचासमक्ष कारचा पंचनामा केला असता कारमध्ये ९० एमएलच्या देशी दारू संत्रा भिंगरीच्या बॉटलीचे तीन बॉक्स, १८० एमएलच्या देशी दारू संत्रा भिंगरीच्या बॉटलीचे नऊ बॉक्स, रॉयल्स स्टॅग १८० एमएलच्या विदेशी दारूच्या बॉटलीचा १ बॉक्स अशी एकूण ४९३८० रुपयांची देशी, विदेशी दारू व तीन लाख रुपये किंमतीची कार एकूण ३४९३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालक पो. शि. सुग्रीव सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पळून गेलेल्या दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास (Gangakhed Police) सहायक पोलीस निरीक्षक राम गिते हे करीत आहेत.