गंगाखेडच्या परळी रस्त्यावरील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed police) : उसतोडीच्या रकमेवरून अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात गेलेल्या तपास अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना बुधवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास परळी रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की ऊसतोडीच्या रकमेसाठी (Gangakhed police) गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी येथील एकाचे अपहरण करून त्यास बीड जिल्ह्यात डांबून ठेवल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपी बुधवार दि. १६ ऑक्टोबर रोजी ऊसतोडणीसाठी कारखान्यावर जाणार असल्याची माहीती या गुन्ह्यातील फिर्यादीचे चुलते संजय सखाराम रुडावत यांनी पोलिसांना दिली. यावरून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गीते, पोलीस शिपाई परसराम परचेवाड, चालक सुग्रीव सावंत शासकीय वाहनाने आरोपींना ओळखणाऱ्या संजय रुडावत यांना सोबत घेवून रात्री ८:३० वाजेच्या सुमारास परळी रस्त्यावरील वैतागवाडी पाटीवर जावुन ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात आरोपी मिळून आले नाही.
यामुळे पोलीस गंगाखेडकडे (Gangakhed police) परत निघाले असता संजय रुडावत यास बाबु लालसिंग चव्हाण, नारायण बाबू चव्हाण, अशोक दासू जाधव, नारायण दासू जाधव मारहाण करीत असल्याची माहिती ९ वाजेच्या सुमारास पोलीस पाटील यांनी फोनवर दिल्याने सपोनि राम गिते व पोलीस कर्मचाऱ्यांनी परत तेथे जाऊन सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न केला असता वरील चौघानी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गीते व पोलीस शिपाई परसराम परचेवाड यांना मारहाण केली. पोलीस पाटील व चालक सुग्रीव सावंत यांनी सोडवा सोडव करून मदतीसाठी गंगाखेड पोलीस ठाण्यातुन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलविले असता चौघे ही तेथून फरार झाले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात १) बाबु लालसिंग चव्हाण, २) नारायण बाबु चव्हाण, ३) अशोक दासु जाधव व ४) नारायण दासु जाधव सर्व रा. दगडवाडी ता. गंगाखेड यांच्याविरुद्ध मारहांण करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडके हे करीत आहेत.