धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची मागणी
परभणी/गंगाखेड (Santosh Deshmukh) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपी करावे या मागणीसह हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या गंगाखेड बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यापार पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व यास जबाबदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे या मागणीसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरुवार रोजी गंगाखेड शहर बंद पुकारण्यात आला होता. यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळ पासूनच व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवत बंद मध्ये सहभाग घेतला.
सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील भगवती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून (Santosh Deshmukh) सरपंच संतोष देशमुख अमर रहे, खुनाच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना आरोपी करावे. अशा घोषणा देत नायब तहसीलदार अशोक केंद्रे, परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या कडे निवेदन सादर केले. यावेळी मराठा समाज बांधव व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.