नाहर्कत प्रमाणपत्रासाठी मालमत्ता कर भरणे आवश्यक!
रिसोड (General Election) : निवडणुकीत भाग्य आजमावण्यासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र त्यासाठी मालमत्ता कर भरल्याशिवाय मिळत नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर परिषदेच्या कर विभागाने 8 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल २ लाख ३५ हजार ४३३ रूपयांची करवसुली करून इच्छुकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा केला.
नगर परिषदेच्या अध्यक्ष व 23 सदस्यांच्या रिक्तपदांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याअनुषंगाने १० ते १७नोव्हेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना सोबत उमेदवारांना नगरपरिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते आणि उमेदवारांना स्वतःचा तथा सूचक आणि अनुमोदक यांचा मालमत्ता कर पूर्ण भरल्याशिवाय पालिका प्रशासन हे नाहरकत प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे 7 नोव्हेंबर रोजी सुमारे २० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी नगर परिषदेच्या कर विभागात जाऊन स्वतः चा आणि आपल्या सूचक व अनुमोदक यांचा सुमारे 8 लाख ३५ हजार ४३३ रुपयांचा कर भरला आहे. इतरवेळी कराची एवढी रक्कम गोळा करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसाचा अवधी लागतो. मात्र, निवडणुकीमुळे हे काम एका दिवसात झाले. येत्या काही दिवसात बक्कळ कर वसूल होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्याधिकारी सतीश शेवदा व कर निरीक्षक अब्दुल शाह, अनिल सानप, शिवहार मिसाळ, एन डी चराटे ,सोमनाथ ओवाळकर, अब्दुल जमील आदीनी कर वसुली प्रयत्न केले आहे
