नागपूर (Gharoghari Tiranga) : केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महापालिकेद्वारे शहरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ‘तिरंगा अभिवादन’ उपक्रमांतर्गत नागपुरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या निवासस्थानी भेट देउन सत्कार करण्यात आला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक यादवराव देवगडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानचिन्ह, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि तुळशी रोपटे देऊन सन्मानित केले.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकूण ३२३ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या नावांची नोंद आहे. यातील नागपूर शहरात राहत असलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा महापालिकेतर्पेâ सन्मान करण्यात आला. दहाही झोनच्या सहायक आयुक्तांद्वारे स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनमध्ये सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, धरमपेठ प्रकाश वराडे, हनुमान नगर नरेंद्र बावनकर, धंतोली प्रमोद वानखेडे, नेहरूनगर आणि सतरंजीपुरा घनश्याम पंधरे, गांधीबाग गणेश राठोड, लकडगंज विजय थुल, आशीनगर हरीश राउत आणि मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक घारोटे यांनी झोनअंतर्गत स्वातंत्र्य सेनानींना सन्मानचिन्ह, मनपाचा दुपट्टा आणि तुळशीरोप देउन सन्मानित केले.
घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागपूर शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या अंतर्गत मनपाद्वारे तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा दौड, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा शपथ, तिरंगा सेल्फी, तिरंगा मानवंदना आदी उपक्रम राबविण्यात आले.
झोन कार्यालय आणि सेल्फी पॉईंटवर झेंडा विक्री केंद्र सुरु
‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारद्वारे नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा झेंडा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर शहरातील नागरिकांना अत्यल्प दरात तिरंगा झेंडा उपलब्ध व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोन कार्यालय आणि मनपाने उभारलेल्या सेल्फी पाँईटवर झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होउन घरावर झेंडा फडकावावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
शहरात विविध ठिकाणी रोषणाई
घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून मनपाद्वारे नागपूर शहरातील विविध ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील सक्करदरा पूल, सदर पूल आणि रामझुला आकर्षक तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. मनपाच्या विद्युत विभागाद्वारे शहरात करण्यात आलेली आकर्षक तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर वातावरण निर्मितीच्या दृष्टीने मनपाद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.