पत्रकार परिषदेत युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे यांची मागणी
परभणी (Parbhani Assembly) : शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह परभणीमुळे मिळाले. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील मतदारांनी शिवसेना पक्ष, शिवसेना प्रमुख धनुष्यबाणाला साथ दिली आहे. परभणी विधानसभेसाठी स्थानिक भूमिपूत्र उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे यांनी केली. आगामी (Parbhani Assembly) निवडणुकीच्या अनुषंगाने आप्पाराव वावरे यांच्या संपर्क कार्यालयात मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जगदीश चापके, बाळासाहेब पानपट्टे यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना आप्पाराव वावरे म्हणाले की, (Parbhani Assembly) विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेची जागा शिवसेनेला सुटणार आहे. परभणी विधानसभेने आत्तापर्यंत शिवसेनेला साथ दिली आहे. मात्र बाहेरुन आयात केलेले उमेदवार निवडुन आल्याने परभणी विधानसभेचा विकास झालेला नाही. यंदा स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक उमेदवारास येथील जनता व त्यांचे प्रश्न माहित असून ते प्रश्न सोडविण्याचे काम स्थानिक उमेदवार करु शकेल.
विधानसभा क्षेत्रात कोणतीच विकासकामे झालेली नाहीत. केवळ विकासकामाचे उद्घाटन, नारळ फोडण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत. विधानसभेत रोजगार, मुलभूत सुविधा, शिक्षण अशा समस्या कायम आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बदल करुन मतदारांनी स्थानिक उमेदवाराला साथ द्यावी, असे प्रतिपादन आप्पाराव वावरे पत्रकार परिषदेत यांनी केले.