लातूर(Latur):- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी व गतवर्षीचा पीकविमा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसने (Congress) दिला आहे. गुरुवारी (दि.25) निलंगा येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे हा इशारा दिला.
काँग्रेसचा इशारा; निलंग्यात उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
मोठमोठ्या पोकळ घोषणा करून सत्तेत आलेले केंद्र व राज्य सरकारने(state government) अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार व बेरोजगारांची प्रचंड निराशा केली आहे. ठोस असे काहीच जगाच्या पोशिंद्याच्या पदरात पडले नाही, याचा तीव्र निषेध आम्ही काँग्रेस पक्षातर्फे करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांना मोफत व दिवसा वीज पुरवठा (power supply)करावा, तसेच रोहित्र दुरुस्ती तात्काळ व्हावी म्हणून पुरेसा ऑईल पुरवठा करण्यात यावा, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या. शेतकऱ्यांना रोहीत्र देताना नेहमीच ऑईलचे कारण सांगून वेळेवर दिले जात नाही. केवळ आईलचे कारण सांगून होणारी शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी. अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल, याची गंभीर नोंद घ्यावी, असा इशारा काँग्रेसने निवेदनात दिला आहे. प्रदेश सचिव अभय साळुंखे, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, पंकज शेळके, सुधाकर पाटील, एडवोकेट नारायणराव सोमवंशी, अजित नाईकवाडे, वीरभद्र आग्रे, विठ्ठलराव पाटील, शकील पटेल, रमेश मोगरगे, धनाजी चांदोरे ,अपराजित मरग्ने, गिरीश पात्रे यांची यावेळी उपस्थिती होती.