अनेक कामगारांची प्रकृती खालावली
– मंगेश तायडे
नांदगाव पेठ (Golden Fiber) : पंचतारांकित एमआयडीसी मधील गोल्डन फायबर नामक कंपनी मध्ये रविवारी सकाळच्या सामान्य शिफ्ट मधील तब्बल दोनशे कामगारांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान कामगारांमध्ये हा प्रकार घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक वैद्यकीय चमूला पाचारण करून बाधित कामगारांवर उपचार केले. मात्र (Golden Fiber) वैद्यकीय चमूने परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर व्यवस्थापनामधील जे. एस. रावत याने बाधित कामगारांना रुग्णालयात गेले तर नोकरीवरून काढून टाकू असा धमकीवजा इशारा दिल्याने अनेक कामगार आपापल्या घरी परतले. मात्र मनसेचे पप्पू पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलिसांना घेऊन कंपनीमधील अत्यवस्थ कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
व्यवस्थापनाने कामगारांना उपचार घेण्यापासून रोखले
गोल्डन फायबर (Golden Fiber) धागा बनवणारी कंपनी असून याठिकाणी सातशे पेक्षा अधिक कामगार काम करतात.रविवारी सकाळी ९ ते ५ या सामान्य शिफ्ट मध्ये दोनशे पन्नास कामगार कामावर रुजू झाले. कामावर रुजू होण्यापूर्वी कंपनीच्या कँटीन मध्ये सर्व महिला व पुरुष कामगारांनी सकाळचा नाश्ता केल्यानंतर पाणी प्यायले आणि क्षणार्धात सर्वांना उलटी, मळमळ व पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला.व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिल्यानंतर व्यवस्थापन मधील जे.एस.रावत याने तातडीने वैद्यकीय चमुला पाचारण केले.
युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली व्यवस्थापकाची धुलाई
वैद्यकीय चमूने सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यातील (Golden Fiber) अत्यवस्थ कामगारांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र रावत याने कामगारांना ओआरएस पावडर देऊन बळजबरीने काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच रुग्णालयात न जाण्यासंदर्भात कामगारांना तंबी दिली. काही अत्यवस्थ कामगारांना माहुली जहागीर व गावातील रुग्णालयामध्ये उपचार घेण्याच्या अटीवर त्यांना बाहेर सोडले. मात्र शंभर पेक्षा अधिक कामगारांना कंपनीत डांबून ठेवल्याने याबाबतची माहिती मनसेचे पप्पू पाटील यांना मिळाली.पप्पू पाटील यांनी त्यांच्या कामगार अध्यक्षांना कंपनीमध्ये पाठवले मात्र रावत याने कंपनीत प्रवेश नाकारल्याने पप्पू पाटील यांनी नांदगाव पेठ पोलीसांना सोबत घेऊन गोल्डन फायबर कंपनीत प्रवेश केला आणि सर्व बाधित कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
घटनेची (Golden Fiber) माहिती खा. बळवंत वानखडे, आ. रवी राणा, प्रहारचे जीलाध्यक्ष छोटू महाराज वसू, महानगर प्रमुख बंटी रामटेके यांना मिळताच त्यांनी सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात खा. वानखडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या. पप्पू पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर गोल्डन फायबर मधील बाधित कामगार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्याने व्यवस्थापनामधील जे. एस. रावत व मंगेश घोडे यांनी कामगारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगेश घोडे याची जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातच धुलाई केली.
दाखल रुग्णामंध्ये (Golden Fiber) अमृता राजू कंगाले, स्वाती निलेश रोकडे, पूजा भारत मेश्राम, योगिता संजय लांडगे,मीना विनोद उके, किरण नितीन गायकवाड, योगिता जगन्नाथ खोपे, कविता सुधीर शिंगाळे, प्रांजली छत्रपती मनोहरे, अनिता प्रेमदास वानखडे, रेशमा नंदू तायडे, सोनू राजेश चव्हाण, वर्षा प्रभाकर इंगळे, साधना धरम ढोके, लीला कवडू नन्नावरे, रत्नमाला प्रमोद निकोसे, रवीना मनोहर चांदणे, मंजू रवी बागडे, मीना सुशील कांबळे, सीमा संजय तुपकर, चित्रा गोपाल ठाकरे, सुमन महेंद्र कोकाटे, भाग्यश्री रोशन लोणारे, पूजा सचिन वानखडे, शिल्पा संजय धनसुईकर, जयश्री मंगेश वालीवकार, सुवर्णा दिनेश वानखडे, प्रीती बाळू माने, मीना सुरेश तायडे, रंजना देविदास तिडके, चंदा कैलास घोडेस्वार, चित्रा तायवाडे, माधुरी प्रशांत वानखडे, वैशाली कामोलकर चित्रा केणे, अर्चना बालपांडे, अक्षय अशोक उईके, पंकज जटाये, प्रफुल्ल गजभिये बिट्टू पटेल, प्रदन्यूम चौराया यांचा समावेश असून अकरा अत्यवस्थ रुग्णांना दाखल करण्यात आले तर इतर रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
पोलिसांकडून कायदेशीर कारवाईचे संकेत
घटनेची तातडीने दखल घेऊन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे व पोलीस कर्मचारी यांनी गोल्डन फायबर मधील रुग्णांना बाहेर काढून त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सर्व रुग्णांचे बयाण घेण्यात आले. उद्या (Golden Fiber) गोल्डन फायबर मधील पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात येणार असून त्यांनतर व्यवस्थापनावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे संकेत पो.नि. अंभोरे यांनी दिले.
कामगारांमध्ये संताप
दरम्यान गोल्डन फायबर (Golden Fiber) मधील कामगारांनी व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त करत त्यांच्या हुकूमशाही धोरणाचा निषेध केला. जे.एस.रावत यांच्या हुकूमशाही आणि कामगार विरोधी धोरणामुळे अनेक कामगारांमध्ये संताप आणि चीड यावेळी दिसून आली. पोलीस आणि पप्पू पाटील यांनी लगेच दखल घेतलीनसती तर अनेक कामगार मृत्यूमुखी पडले असते असा दावा सुद्धा संतप्त कामगारांनी केला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता.