अर्जुनी/मोरगावच्या खोकरी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून हत्ती गेल्याने नुकसान
गोंदिया (Gondia Elephant) : जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले असता अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता त्यातच पुन्हा 1 वर्षाने गोंदिया जिल्ह्यात हत्ती (Gondia Elephant) आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सदर हत्ती गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या कळपातुन भटकत गोंदिया जिल्ह्यात आला आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केशोरी सहवन क्षेत्राच्या चिचोली-खोकरी परिसरात एका हत्तीने एन्ट्री केली आहे.
नुकसान भरपाई देण्याची शेतवकऱ्यांची मागणी
सदर हत्ती शेतातून जात असताना खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले आहे.सध्या पावसाळा सुरु असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकांची रोवणी केली. याच शेतातून हत्ती गेल्याने लावलेले भात पिक एका हत्तींने (Gondia Elephant) पायाखाली तुडवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाने पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.