गोंदिया (Gondia BJP) : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता व माजी आमदार रमेश कुथे (MLA Ramesh Kuthe) यांनी आज (ता.२१) भाजपला रामराम करीत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कुथे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावणकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. त्याच्या अचानक राजीनामा दिल्याने जिल्हा भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा
गोंदिया विधानसभा क्षेत्रातून दोनदा आमदार राहिलेले रमेश कुथे (MLA Ramesh Kuthe) हे सन २०१४ मध्ये भाजपवासी झाले होते. यानंतर भाजपातील वरिष्ठ नेता म्हणून त्यांना स्थान देण्यात आले होते. परंतु, काही दिवसांपासून भाजपातील अंतर्गत कलह वेळोवेळी दिसून आली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. पराभवाला घेवून भाजपात दोन गट पडल्याचे दिसून आले. पराभवाचे मंथन करण्याऐवजी एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू होते. त्यातच रमेश कुथे यांनी भाजपला सोडचिट्टी देत भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना पाठविला आहे. त्याच्या राजीनाम्याने भाजपासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला दुसरा धक्का बसल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.
नव्या राजकीय समीकरणाची चाहुल
माजी आमदार रमेश कुथे (MLA Ramesh Kuthe) यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले व लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी कुथे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीनंतर गोंदिया विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुध्दा याबाबत हिंट दिली होती. त्यातच कुथे (MLA Ramesh Kuthe) यांनी भाजपला रामराम केल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्रात नव्या राजकीय समीकरण तयार होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. आगामी काळात कुथे कोणत्या पक्षात जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.