गोंदिया (Dharmarao Baba Atram) : जिल्ह्यात मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर पीके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तर घर, गोठ्यांची पडझड झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिक, घर व गोठ्यांचे तातडीने पंचनामे करावे, अशा सुचना पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता. १५) पूरपरिस्थिती बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते. पालकमंत्री आत्राम पुढे म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्थांना शासनाच्या नियमानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मदत देण्यात येणार असून मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे (Dharmarao Baba Atram) त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मान्सून (Heavy rain) कालावधीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यात १२२०.०३ मि. मी. पाऊत होतो. परंतु यावर्षी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत १२७४.१ मि.मी. पाऊस पडलेला आहे. म्हणजे एकूण पावसाचा ११४.३ टक्के पाऊस झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्व आठही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान पाच व्यक्ती मृत झाले. २०८९ घरांचे अंशतः तर ४३ घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. ५१८ गोठ्यांचे नुकसान झाले. लहान-मोठी एकूण ५३ पशुहानी झाली आहे.
अतिवृष्टीमुळे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनातर्फे आठही तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरावत लवकर लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. सभेला खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, माजी आमदार राजेंद्र जैन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बिरसोला गावाला भेट
पालकमंत्री आत्राम आज (ता. १५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील (Heavy rain) पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर (Dharmarao Baba Atram) पालकमंत्री आत्राम यांनी पुरग्रस्त बिरसोला गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी पुरपरिस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच फुलचूर येथील रामेश्वर कॉलनीमधील इमारत कोसळलेल्या अग्रवाल कुटुंबियाची भेट घेवून सांत्वन केले.