गोंदियाकर सुखावले; २५ महसूल मंडळात अतिवृष्टी
गोंदिया (Gondia Heavy rain) : हवामान विभागाने १९ व २० रोजी मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तविली होती. त्यानुरूप विदर्भात पावसाने हाहाकार माजविले. मात्र गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी व जिल्हावासी सुखावल्याचे चित्र पहावयास मिळाले. काल (ता.१९) व आज (ता.२०) सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. एंकदरीत जिल्ह्यातील २५ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली. आजच्या पावसामुळे रोवणीच्या कामांना वेग आले आहे. असे असले तरी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या तीन तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी असल्यामुळे रोवणीचे काम खोळंबले होते.
अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व देवरी तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी
जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. दिर्घ प्रतिक्षेनंतर काल व आज (Heavy rain) मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी, तिरोडा व सालेकसा या पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामांना वेग आले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस
काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी..अशी परिस्थिती निर्माण झाली. नदी-नाले दुथडी वाहू लागले. शेतजमिन पाण्यात सापडली. तर अनेक गावागावातील घर व शाळांमध्ये पाणी शिरले. यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुक्यात सर्वत्र पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकच तारांबळ उडाली होती. त्याचबरोबर बरडटोली येथील शाळेने पाण्याने वेढा घातला होता. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तालुका प्रशासन, पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असल्याचे पहावयास मिळाले. कुठेही अप्रिय घटना घडली नसली तरी (Heavy rain) मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले होते.
पिंडकेपार येथील इसम पुरात वाहून गेला
देवरी तालुक्यात काल व आज जोरदार पाऊस (Heavy rain) पडला. दरम्यान पिंडकेपार/गोटाबोडी येथील नाल्यात मासेमारीसाठी गेलेला इसम पुरात सापडल्याने वाहून गेला. ही घटना आज (ता.२०) दुपारी १२.१५ वाजता सुमारासची आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर इसमाचा शोध घेण्यात आला. या घटनेत मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव विजय नाईक (३८) रा.गोटाबोडी असे आहे.
पुरात सापडलेल्या त्या चौघांसाठी जवान ठरले देवदूत
अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या दोन तालुक्याला पावसाने झोडपून काढले. दरम्यान नदी, नाले दुथडी वाहू लागले. शेतशिवाराला पाण्याचे वेढा घातला. अचानक (Heavy rain) पावसाचा जोर वाढल्याने शेतात रोवणीचे काम करीत असलेले अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरीगाव/बर्ड्या येथील पती-पत्नी व सडक अर्जुनी तालुक्यातील राका /पिपरी येथील बापलेक पाण्याच्या वेढ्यात अडकले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. त्या चौघांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान देवदूत ठरले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव बर्ड्या येथील यशवंत पाडूरंग कोसरे व त्याची पत्नी आशा कोसरे हे दोघे जण सकाळीच येरंडी देवी शिवारात असलेल्या शेतात रोवणीच्या कामासाठी गेले होते. त्याचप्रमाणे सडक अर्जुनी तालुक्यातील राका/पिपरी येथील बापलेक शेतकामात व्यस्त होते. अचानक दोन्ही घटनास्थळी पाण्याचा वेढा वाढला. परिसरातील शेतशिवार पाण्यात सापडले. सतत पाण्याची पातळी वाढत असल्याने चारही जणांना बाहेर पडणे कठीण झाले. या प्रकाराची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून पाण्याच्या वेढ्यात सापडलेल्या चौघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुखरूप बाहेर पडलेल्या चौघांनी सुटकेचा श्वास घेत तुम्ही आमचे देवदूत ठरले, असेच व्यक्त करून जवानांचे आभार मानले.
शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली
अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तसेच देवरी या तीन तालुक्यात मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. यामुळे नदी-नाले दुथडी वाहू लागले. त्याचबरोबर पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक पाण्याखाली सापडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधी पावसाची दिर्घ प्रतिक्षा असतानाच आता मुसळधार पावसाने शेतकर्यांना अडचणीत आणले आहेत.
मार्ग बंद…गावे संपर्काबाहेर
सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या तीन तालुक्यात मुसळधार पावसाने (Heavy rain) अनेक मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली होती. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी- खांबी, बोरी-कोरंभीटोला, महागाव-बोरी, केशोरी-वडसा, दिनकरनगर-केशोरी, प्रतापगड-करांडली, मांडोखाल-बोरी, इसापूर-माहुरकुडा, इसापूर-महागाव, निलज-केशोरी, खामखुर्रा-धानोरी त्याचप्रमाणे देवरी तालुक्यातील देवरी-शेडेपार, देवरी-कन्हाळगाव, शिलापूर-फुक्कीमेटा या मार्गावरील वाहतूक बंद पडून गावा-गावातील संपर्क तुटले होते.
घरांची पडझड
मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात घराची पडझडही सुरू झाली. धाबेटेकडी टेकडी येथील दिलीप मधुकर कार्णिक यांचे घर पूर्णत: पडला. त्याचबरोबर किर्ती सोनवाने, रामचंद सोनवाने यांचे घरही पावसाने क्षतिग्रस्त (Heavy rain) झाले. यामुळे कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक घर व गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाल्याचे दिसून आले.
या महसूल मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यातील एकूण ४१ महसूल मंडळापैकी २५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये तिगाव, ठाणा, तिरोडा, ठाणेगाव, मोहाडी, तिल्ली, कावराबांध, सालेकसा, साकरीटोला, आमगाव खुर्द, मुल्ला, देवरी, चिचगड, सिंदीबिरी, ककोडी, नवेगावबांध, बोंडगावदेवी, अर्जुनी, महागाव, केशोरी, गोठणगाव, सौंदड, डव्वा, सडक अर्जुनी, शेंडा या महसूल मंडळांचा समावेश आहे. तर १० महसूल मंडळात समाधानकारक पाऊस (Heavy rain) पडला आहे. उर्वरित सहा महसूल मंडळात नावापुरतेच मेघ बसरले.
तालुकानिहाय सरासरी पाऊस
तालुका — आजचा पाऊस — एकूण पाऊस (टक्के)
गोंदिया — ३५.५ मिमी — ३५५.२ (७७.२)
आमगाव — ६०.१ मिमी — ३८२.६ (६८.३)
तिरोडा — ७३.२ मिमी — ३८८ (८४.९)
गोरेगाव — ६३.९ मिमी — ३८३.७ (९७.५)
सालेकसा — ७८.२ मिमी — ३४५.३ (७५.६)
देवरी — १२३.५ मिमी — ५०४.१ (१०५)
अर्जुनी मोरगाव — १५३.६ मिमी — ५७३.५ (१०५.५)
सडक अर्जुनी — ७९.४ मिमी — ३४४.६ (६३.६)
एकूण — ८३ — ४१२.२ (८९.५)