पावसाने केली सांबा विभागाची पोलखोल
देवरी/गोंदिया (Gondia main road) : देवरी तालुक्यातील भर्रेगाव-कलुसावटोला या मुख्य रस्त्याची दोन महिन्यापूर्वी डागडुजी करून डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याची समस्या मार्गी लागली, असे परिसरातील नागरिकांना वाटत होते. परंतु, पहिल्याच पावसाने सार्वजनिक (Construction Department) बांधकाम विभागाची पोलखोल केली. पाऊस पडताच रस्त्याचे तिनतेरा वाजले. आणि निकृष्ट बांधकामाचा प्रकार चव्हाट्यावर आला. सदर डांबरीकरण मार्गाला भेगा पडल्या असून छोटा पुल खचल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता तयार करण्याच्या नावावर कंत्राटदार व अधिकार्यांनी फक्त खिसे गरम केले का? अशी चर्चा करून भर्रेगाव व कलुसावटोला येथील नागरिक आक्रोश व्यक्त करीत आहेत.
देवरी तालुक्यातील भर्रेगाव ते कलुसावटोला या १० किमीच्या रस्त्याचे दुरवस्था झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड देत रहदारी करावे लागत होते. त्यातच नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याची डागडुजी व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आले. सदर काम दोन महिने चालले. यादरम्यान रस्ता दुरूस्त होवून डांबरीकरण होत आहे, त्यामुळे दर्जेदार रस्ता तयार होणार, अशी अपेक्षा भर्रेगाव, (Bharregaon-Kalusavatola) कलुसावटोलासह परिसरातील नागरिकांना होती. परंतु, पहिल्याच पावसाने सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्या कामाची पोलखोल केली.
अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याने पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. अनेक ठिकाणी माती खचल्याने खड्डे पडले आहेत. तर मार्गावरील लहान पुल खचल्याने खड्डा तयार झाला आहे. या कारभाराने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Construction Department) साबां. विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराने आपल्याच हिशोबाने रस्ता तयार केल्याचे रस्त्याच्या दयनिय अवस्थेवरून दिसून येत आहे. त्यामुळे रस्ता डागडुजी व डांबरीकरणाच्या नावावर शासन निधीची परस्पर विल्हेवाट लावण्याचे काम कंत्राटदाराने केल्याची चर्चा परिसरात आहे. या कामाची वरिष्ठांकडून सखोल चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भर्रेगाव, कलुसावटोला परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
रस्ता झाला धोकादायक
भर्रेगाव-कलुसावटोला (Bharregaon-Kalusavatola) १० किमीचा रस्ता डांबरीकरण करण्यात आले. परंतु, निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याने रस्त्यावरील डांबरीकरण ठिकठिकाणाहून उखडले आहे. काही ठिकाणी भेगा पडल्यात असून रस्ता खचला आहे. या मार्गावर असलेले लहान पुल खचल्याने खड्डा तयार झाला आहे. यामुळे रात्रीबेरात्री रहदारी करणे धोकादायक झाले आहे. यामुळे रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचा होत असतानाही अधिकार्यांचे लक्ष गेले नाही का? असा प्रश्न निर्माण करून नागरिक असंतोष व्यक्त करीत आहेत.