देशोन्नती वृत्तसंकलन
सिंदेवाही (MP Hansraj Ahir) : नवरगाव ही संस्काराची भूमी आहे. भारतीय शिक्षण संस्था आणि भारत विद्यालय, ज्ञानेश महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना घडवणारे केंद्र आहे. चांगले संस्कार देऊन राष्ट्राच्या उभारणीसाठी विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे नागरिक घडवणे हे शाळा महाविद्यालयाचे काम आहे. असे संस्कारित नागरिक या परिसरातून निर्माण होतात ही आनंदाची गोष्ट आहे. भारत आज सर्व पातळ्यावर आघाडीवर आहे. एकीकडे आम्ही चंद्रयान सोडतो आहे.
दुसरीकडे भारतीय ज्ञानपरंपरा यांचाही अभ्यास करतो आहे. खरे तर अत्यंत समर्पण भावनेने दुर्गम परिसरात या शिक्षण संस्थेचे संस्काराचे काम चालू ठेवले आहे. ज्यांचे संस्कार संपतात ते पक्षही संपतात. इथे मात्र आजही विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जातात. म्हणून नवरगाव ही पवित्र संस्कारभूमी आहे असे गौरवउदार भारताचे माजी गृहराज्यमंत्री व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (MP Hansraj Ahir) यांनी काढले. ते स्व. परमानंद पाटील बोरकर स्मृती सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री परशुराम खुणे हे होते. ५८ वर्ष सहजीवन लाभलेल्या स्व. परमानंद पाटील बोरकर यांच्या पत्नी सुनंदा बोरकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद बोरकर यांनी केले. बोलताना त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणानिमित्त मी आणि माझ्या बहिणींनी संस्थेला या सभागृहाच्या बांधकामासाठी आपल्या वडिलांच्या ठेवी दान दिल्या. म्हणूनच हे भव्य सभागृह इथे आज उभे राहिले आहे. याचे लोकार्पण होताना आम्हालाही खूप आनंद होत आहे.’ असे ते (MP Hansraj Ahir) म्हणाले.
या कार्यक्रमाचे आभार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर यांनी मानले. यावेळी भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैवाली वैद्य यांनी स्व. परमानंद पाटील बोरकर यांच्या स्मृतीस उजाळा दिला. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन कोरतलवार यांनी केले. यावेळेस शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य घटक संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.