राष्ट्रीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
हिंगोली (Gopinathrao Munde) : येथील श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती, पुणे यांनी संतांचा सामाजिक समतेसाठी संघर्ष या विषयावर कै. शिवाजीराव देशमुख सभागृह येथे पुष्प गुंफिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊंट लिटेरा जी स्कूल हिंगोली चे संस्थापक कैलास बांगर, उद्घाटक उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास आघाव, प्रमुख पाहुणे बसंत भट्ट, प्रमुख पाहुणे माजी आमदार रामराव वडकुते व माजी आमदार गजाननराव घुगे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे अध्यक्ष डॉ. शत्रुघ्न जाधव, मा जिजाऊ व्याख्यानमालेचे प्रा.पंडित अवचार व पंडित शिरसाट, सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती, व ग्रामीण व शहरी भागातील श्रोतेमंडळी उपस्थित होते.व्याख्यानमालेचे स्वागत गीत प्राची शेळके या चिमुकलीने तर राष्ट्रसंत भगवान बाबा यावरील कविता उद्घाटन प्रसंगी कवी अशोक गुट्टे सालेगावकर यांनी सादर करीत शुभारंभ केला.
उद्घाटक उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी विद्यार्थी वयामध्ये व्याख्यान देण्याची कला विकसित होणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपण जबाबदारीच्या पदांवर गेल्यानंतर आपल्याला समाजप्रबोधनासाठी तसेच आपल्या कार्यालयातील सहकार्यांशी विचारांचे आदान-प्रदान कला अवगत होऊन कार्य सुलभ होते. त्यामुळे युवकांनी अशा व्याख्यानमालेचा उपयोग करून घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.
या (Gopinathrao Munde) कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्य अतिथी वसंत भट्ट यांनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य ही बाब सामाजिक मूल्य जपणारी चळवळ आहे. यामुळे सामाजिक प्रश्नांची उकल होईल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव आघाव, यांनी मागील दोन वर्षात विविध व्याख्याने श्रोत्यांच्या मनाला नवी ऊर्जा देणारे ठरले व त्यातून समाज प्रबोधन होऊन आज ग्रामीण व शहरी भागातील मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून वेळेवर उपस्थित झाली असे मनोगत व्यक्त केले.
नायब तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विकास बांगर व अमोल घुगे यांचा मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला. अविनाश भारती यांनी महाराष्ट्रातील संतांनी जातीभेद अमंगळ यावर अनेक उदाहरणे देत सामाजिक समतेसाठी संतांनी केलेल्या शिकवण व कार्यांचा उल्लेख केला. वारकरी संप्रदायाने खर्या अर्थाने समतेचे बीजरोपण आणि जाती धर्मामध्ये भेद न करता माणूस म्हणून माणुसकीचा धर्म जपणारे व्यासपीठ उभं केलं. हे करत असताना विविध धर्मातल्या व जातीच्या व्यक्तींना महिलाना समान संधी देत अनेक वर्षांपूर्वी ही समतेचे बीज जनमानसात रुजविण्याचे काम संतांच्या माध्यमातून झालेला आहे.
ज्यामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज ,संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली, या विविध संतांच्या धर्म ग्रंथातील अभंग व भारुड दाखले दिले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समते विचार आचरण करून श्रोत्यांच्या हृदयस्पर्शी केला.आपलेच माणसं आपला माणसं विरोध करतात व कालांतराने सत्य पटल्यानंतर त्या नामाचा जयघोष करतात हे सत्य इतिहासातील घटनांचा अभ्यास केला असता ज्ञात होते हे दाखल्यासह पटवून दिले.स्वार्थासाठी विषमता निर्माण करणार्या लोकांपासून युवकांनी अंतर राखावे व विश्वची माझे घर या नुसार माणुसकी धर्म जपावा.
सामाजिक प्रबोधनाच्या व्याख्यानमाला तसेच सामाजिक समतेसाठी असलेल्या विविध चळवळीमध्ये हिरीरीने भाग घेऊन विचारांचा वारसा जपावा व समतेच्या बीजारोपणाचा कार्य करावे ही प्रबोधन चळवळ सामाजिक समतेचे दीप प्रज्वलन ही खर्या अर्थाने आजच्या काळाची गरज झालेली आहे . हे सर्वांच्या कल्याणासाठी गरजेचे आहे. श्रोते मंडळीनी राजकारण , समाजकारण यामधून विषमता निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन नागरिकांनी जागरूक राहावे व सतत समतेसाठी संघर्ष करावा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून श्रोतेचे मन जिंकले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ घुगे ,प्रास्ताविक मेजर पंढरीनाथ घुगे पाहुण्यांचा परिचय संजय चाटे व आभार प्रदर्शन गोपाल बांगर यांनी केले.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प दिनांक १४ डिसेंबर रोजी ‘बहुजनांचे प्रेरणास्थान एक चिंतन’ या विषयावर शिवचरित्रकार तथा प्रसिद्ध व्याख्याते डॉ. अशोक बांगर व्याख्यान होणार आहेत . व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व ग्रामीण व शहरी भागातील श्रोतेमंडळी परिश्रम करीत आहे. सामाजिक जाणिवेतून समाज प्रबोधनाच्या कामात तन्मयतेने श्रोते व्याख्यानमालातील व्याख्यान श्रवण करण्यासाठी शेकडोच्या संख्येने उपस्थिती हे परिश्रमाचे शिदोरी आहे ही भावना आयोजकांनी व्यक्त केली.