हिंगोली (Lakshmi Life Care) : राज्य शासनाच्या ‘स्टेमी महाराष्ट्र’ या प्रकल्पांतर्गत हृदय रूग्णांच्या निदान व उपचारा करीता हिंगोलीतील ‘लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल’ (Lakshmi Life Care) सोबत शासनाने सामंजस्य करार केला असल्याची माहिती संचालक डॉ.अखिल अशोक अग्रवाल यांनी दिली आहे.
हृदयविकार हे महाराष्ट्रात होणार्या मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे.हृदयविकाराच्या रूग्णांना तत्परतेने आवश्यक निदान व उपचारसुविधा उपलब्ध करून देऊन हृदयविकारामुळे होणार्या अकाली मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि हृदयविकाराची लक्षणे व त्याकरिता उपलब्ध निदान व उपचार सुविधा यांबाबत जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे या प्रमुख उद्दिष्टांसह महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत स्टेमी महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प २०२१ पासून राबविला जात आहे.
या योजनेचा नुकताच विस्तार करण्यात आला असून राज्यातील हिंगोली जिल्ह्यासहीत एकूण आणखी २२ जिल्हे या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील रूग्णांसाठी हिंगोलीतील ‘लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल’ सोबत शासनाने या योजनेकरीता सामंजस्य करार केला आहे. या रूग्णालयात कार्डियाक कॅथ लॅब उपलब्ध असल्याने हृदय रोगाची लक्षणे असलेल्या रूग्णांची तपासणी व गरज भासल्यास अॅन्जिओप्लास्टी इत्यादी उपचार आता सर्वसामान्यांना शासकीय योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहेत.
याबाबत ‘लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल’ (Lakshmi Life Care) हिंगोली सोबत सामंजस्य करार जिल्हा चिकित्सक डॉ. नितीन तडस , जिल्हा समन्वयक डॉ. मोहसीन खान, राज्याचे प्रकल्प प्रमुख डॉ.विजय कदम, डॉ. अखिल अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल यांनी केला आहे. या करारामुळे हृदय रोग संबंधित रुग्णांना जिल्ह्यातच लाभ मिळेल.
काय आहे ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्प
‘स्टेमी’ म्हणजे एसटी एलिव्हेशन इन मायोकार्डियल इन्फार्क्शन हा सामान्यतः आढळणारा हृदयविकाराचा प्रकार असून यात हृदयाच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा थांबल्यामुळे अपुर्या ऑक्सिजनअभावी हृदयाच्या मांसपेशींना इजा होते व त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.’ स्टेमी प्रकल्पांकरिता हब आणि स्पोक मॉडेलचा वापर करण्यात आला असून हृदयरोगांकरिता सेवा प्रदान करणार्या कार्डियाक केअर युनिट उपलब्ध असणार्या रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती डॉ.नितीन तडस यांनी दिली