परभणी (Parbhani Gram Panchayat) : ग्रामपंचायत सदस्यांना मासिक सभेची नोटीस न बजावणे, मासिक सभा इतिवृत्तावर सही न करणे, ग्रामसभा आयोजीत न करणे, गणपुर्ती नसताना ग्रामसभा घेणे अशी नियमबाह्य कामे करणे जिंतूर तालुक्यातील कौसडीच्या सरंपंचाला महागात पडले आहे. या प्रकरणात दाखल अपीलावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (Collector Raghunath Gawde) यांनी आदेश दिला आहे. कौसडीचे सरपंच शेख मोबीन अब्दुल करीम यांचे पद अनर्ह ठरविण्यात आले आहे. तर (Gram Sevak) ग्रामसेवक बाबासाहेब सखाराम खराबे यांच्याविरुध्द विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आदेश
या बाबत अधिक माहिती अशी की, रंजना सोमाणी व इतर आठ जणांनी अॅड. एस.ए. घुगे, अॅड. एस.यु. डाखोरे यांच्या मार्फत जिल्हाधिकार्यांकडे अपील दाखल केले होते. कौसडीचे सरपंच, ग्रामसेवक हे दोघांना निलंबीत करुन त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. (Gram Panchayat) ग्रामपंचायत कौसडीच्या मासिक सभा, ग्रामसभा वेळेवर होत नाही या सभांविषयी सूचना दिली जात नाही, (Gram Panchayat) ग्रा.पं.ला प्राप्त झालेल्या निधी बाबत माहिती न देता त्याचे नियोजन व खर्च कसा झाला या विषयी माहिती देण्यात येत नाही, असे अपीलात नमुद करण्यात आले.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जदार आणि गैरअर्जदार या दोघांनाही आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली सुनावणीत सदस्यांना मासिक सभेची नोटीस न बजावणे, मासिक सभा इतिवृत्तावर सही न करणे, माहे नोव्हेंबर २०२२ ची ग्रामसभा आयोजीत न करणे, गणपुर्ती नसताना ग्रामसभा आयोजीत करणे या बाबीसाठी सरपंच व ग्रामसेवक दोन्ही दोषी असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश देत अर्जदार रंजना सोमाणी व इतरांचा अर्ज मान्य केला. सरपंच शेख मोबीन अब्दुल करीम यांचे पद अनर्ह ठरविले. तसेच ग्रामसेवक बाबासाहेब सखाराम खराबे यांच्याविरुध्द विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित केली. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना पुढील कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय सुड भावनेतून तक्रार
माझी निवड थेट जनतेतून सरपंच पदावर झाली आहे. अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. जिंतूर तालुक्यातील राजकीय सुड भावनेतून माझ्या विरुध्द तक्रार करण्यात आली. मासिक सभा व इतर गोष्टींचा ताळेबंद ठेवणे सचिव या नात्याने ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. (Collector Raghunath Gawde) जिल्हाधिकार्यांनी सरपंचाचे पद अनर्ह ठरविले आहे. या विरोधात मी विभागीय आयुक्त, न्यायालयात दाद मागणार आहे.
– शेख मोबीन अब्दुल करीम.