शिवसेना उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ परभणीत सभा
परभणी (CM Eknath Shinde) : महायुती सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिलांच्या हितांचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत महिलांच्या खात्यात रक्कम टाकली. शेतकर्यांची कर्जमाफी केली, लाडक्या भावांना रोजगार दिला. विरोधकांनी याचे भांडवल करुन अनेक आरोप करत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार हे देणारे आहे, घेणारे नाही, असे सांगून महाविकास आघाडीवर सडकून टिका केली.
महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
परभणी जिल्ह्यातील परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ शनिवार ९ नोव्हेंबर रोजी संत तुकाराम महाविद्यालय मैदानावर आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. पुढे बोलताना ते (CM Eknath Shinde) म्हणाले की, परभणी ही संतांची भूमी आहे. या भूमीला माझा साष्टांग दंडवट आहे. हाच जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जगात जर्मनी भारतात परभणी असे म्हणतात. याच परभणीला जगात एक नंबरवर नेण्यासाठी आणि परभणीकरांना आनंद देण्यासाठी शिवसेनेने आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली आहे. भरोसे हा भरोस्याचा माणूस आहे.
आनंद भरोसेवर भरोसा म्हणजे एकनाथ शिंदेवर (CM Eknath Shinde) भरोसा. त्यामुळे परभणी जिल्ह्यात विकासपर्व आणण्यासाठी आनंद भरोसेसह महायुतीच्या मेघनाताई बोर्डीकर व इतर उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना उमेदवार आनंद भरोसे म्हणाले की, सन २०१९ मध्ये जनसामान्यांचा सेवक म्हणून महायुतीने विद्यमान आमदारांना संधी दिली. मात्र त्यांनी फक्त आणि फक्त स्व:ताचा विकास साधला. शेतकरी, बेरोजगार, महिलांना वार्यावर सोडले आहे. त्यामुळे लगतच्या शहराचा विकास झाला, मात्र परभणी तालुका भकास झालेला आहे.
आता परिवर्तन घडवून आणण्यासाठी महायुतीचे सरकार आणण्यासाठी मतदान करण्याच आवाहन भरोसे यांनी केले. यावेळी मंचावर माजी खा. सुरेश जाधव, धैर्यशिल उर्फ राजू कापसे, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, माजी आ. हरिभाऊ लहाने, माजी महापौर प्रताप देशमुख, जेष्ठ नेते विजयराव वरपूडकर, आप्पाराव वावरे, बाळासाहेब जाधव, राजेश देशमुख, धम्मदिप रोडे, माणिक पोंढे, शिवाजी भरोसे, राधाजी शेळके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल तुरुकमाने यांनी केले.