गडचिरोली (Gadchiroli) :- गडचिरोली शहरात आज मंगळवारी देशभक्तीचा अभूतपूर्व उत्सव अनुभवायला मिळाला. हजारो देशभक्त नागरिक आणि विविध संघटनांनी एकत्र येत ‘ऑपरेशन सिंदूर'(‘Operation Sindoor’) च्या समर्थनार्थ भव्य तिरंगा यात्रा (Tiranga Rally) काढली. विशेष म्हणजे ही यात्रा भर पावसातही अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पडली, ज्यातून उपस्थितांच्या देशप्रेमाची आणि निष्ठेची प्रचीती मिळाली.
७५ मीटर लांब भव्य तिरंगा, जो विद्यार्थ्यांनी आणि देशभक्त नागरिकांनी अभिमानाने खांद्यावर घेत संपूर्ण मार्गावर फडकविला
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ७५ मीटर लांब भव्य तिरंगा, जो विद्यार्थ्यांनी आणि देशभक्त नागरिकांनी अभिमानाने खांद्यावर घेत संपूर्ण मार्गावर फडकविला. या दृश्याने उपस्थित सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिरंगा यात्रेमध्ये राजकीय नेते, पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचा एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद भाग म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार. त्यांना पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या बलिदानास मानवंदना देताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
यावेळी माजी खा.अशोक नेते, आ. डॉ. मिलिंद नरोटे, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, हेमंत जम्बेवार, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, योगिता पिपरे, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर, जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, रेखा डोळस, अनिल तिडके, केशव निंबोड, डॉ. भारत खटी, गुरुदेव हरडे, अरुण हरडे, मनोज देवकुले, प्रशांत भृगुवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.