बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त
नागपूर (Bail Pola) : श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे. देशभरात विविध नावाने श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणार्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. शेतकर्याचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल. ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा (Bail Pola) बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. आज सोमवारी २ सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे. बैल पोळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या (Bail Pola) बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात.
शेतकर्यांच्या दृष्टीनं (Bail Pola) बैल पोळ्याला विशेष महत्त्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकर्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकर्यांचा मित्र म्हटलं जातं. बैल हा शेतकर्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात. याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.
आज बैलाला सजविले जाणार
पोळ्याच्या दिवशी (Bail Pola) बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजश्रुंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीही काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.
बैलपोळा तिथी आणि मुहूर्त
पंचागानुसार, श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या २ सप्टेंबर रोजी आहे. २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून २१ मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल. तर ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता २४ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, अमावस्या २ सप्टेंबर २०२४ रोजी असून या दिवशी (Bail Pola) बैलपोळा साजरा केला जाणार आहे.