बांधकाम विभाग, हिंगोली नगरपरिषद स्वच्छता विभाग संघाने मिळविला एकहाती विजय
हिंगोली (Cricket League Match) : शिवजन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार संघाच्या वतीने शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ११ फेब्रुवारीपासून क्रिकेट लिग मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी क्वाॅटर फायनलमध्ये पोहोचलेल्या न.प. व महावितरण संघात चुरशीचा सामना झाला. यात महावितरण संघाने उत्कृष्ट गेंदबाजी (Cricket League Match) व फलंदाजीच्या जोरावर सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळविला.
सकाळी ६:३० वाजता वकील संघ (सिनीअर) व बांधकाम विभाग संघात सामना खेळविण्यात आला. यात वकील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत ५२ धावा केल्या. यात ५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उरलेल्या बांधकाम विभागाच्या संघाने केवळ ६ षटकात ५६ धावा करीत विजय प्राप्त केला.
दुसरा सामना पत्रकार संघ व नगर पालिका (स्वच्छता विभाग) संघात (Cricket League Match) झाला. यात पत्रकार संघाच्या वतीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आला. न.प.संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर पत्रकार संघाला ८ षटकात ७१ धावांवर रोखले. तर न.प.संघाच्या फलंदाजानी ७३ धावांचा पाऊस पाडत विजय मिळविला.
तिसरा सामना क्वाॅटर फायनलमध्ये पोहोचलेला न.प.संघ आणि महावितरणच्या संघात झाला. यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न.प.संघाला महावितरणच्या खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करीत ५० धावात गुंडाळले. विजयासाठी ५१ धावांचे लक्ष्य गाठण्याकरीता महावितरण संघाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत ६ गडी राखून सेमी फायनलमध्ये धडक मारली. पंच म्हणून इम्रान कालीवाले, दिनकर कागणे तर स्कोरर म्हणून रोमन सय्यद यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे.
संत नामदेव मैदानावर क्रिकेट फिव्हर…
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व पत्रकार संघाच्या वतीने खेळविण्यात येणाऱ्या (Cricket League Match) क्रिकेट लिग मॅचेस पाहण्यासाठी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर क्रिकेटप्रेमीं हजेरी लावत आहेत. मागील तीन दिवसांच्या लिग मॅचेसमुळे मैदानावर एक प्रकारे क्रिकेट फिव्हर पहायला मिळत आहे. सकाळी ६ वाजेपासूनच सामने पाहण्यासाठी नागरिक हजेरी लावत आहेत.
पत्रकार संघांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार…
क्रिकेट लिग मॅचेससाठी सहकार्य करून प्रोत्साहन दिल्याबद्दल पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते विलास गोरे, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.उल्हास पाटील, बालाजी वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.
हिंगोलीचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत – जगजितराज खुराणा
शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट लिग मॅचेसच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, यापुढेही अशा स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदतीसाठी केंव्हाही तयार असून, हिंगोलीचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती जगजितराज खुराणा यांनी १३ फेब्रुवारी रोजी खेळाडुंशी संवाद साधताना केले.
आजचे सामने…
हिंगोली शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर १४ फेब्रुवारी रोजी क्वाॅटर फायनलमध्ये पोहोचलेला जिल्हा पोलिस संघ विरूद्ध सा.बां.विभागात सकाळी ६:३० वाजता पहिला सामना होणार आहे. तर दुसरा सामना व्यापारी महासंघ विरूद्ध न.प.(स्वच्छता विभाग) संघात खेळविण्यात येणार आहे. तिसरा सामना कोरोना योद्धा (जिल्हा रूग्णालय) विरूद्ध प्रेस क्लब यांच्यात होणार आहे.