प्रा. अरुण सांगोळे, कमलेश भडकमकर आणि अनुराधा पालकुर्ति यांची भव्यदिव्य सांगितिक कलाकृती!
अमरावती (Sarada-Saraswati Vandana) : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दसऱ्याच्या पुर्वसंध्येला देवी शारदेचे प्रार्थना गीत ” शारदे ” प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात आले. देवी शारदा सरस्वती ही भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता मानल्या जाते. वाणी, वाग्देवता,वागीश्वरी,ब्रह्मी, विशाला,मेघा,खुंटीला इ. भिन्न नावांनी तिचा उल्लेख प्राचीन वाड्मयात आढळतो. कालांतराने वाणीची ही स्फुर्तीदेवता विज्ञान व साहित्य यांची अधिष्ठात्री बनली. त्यामुळे चौसष्ट कलांची तज्ज्ञ आणि ललित कलांची अधिष्ठात्री ही उपाधी या देवतेला प्राप्त झाली. हा संपूर्ण आशय आणि भाव लक्षात घेऊन येथील प्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रा. अरुण सांगोळे यांच्या लेखणीतून आदिशक्तीचे सत्वगुणप्रधान रूप धारण केलेल्या या देवीवर सरस्वती वंदना हे काव्यगीत अवतिर्ण झाले. आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुर्वसंध्येला हे गीत युट्यूब, फेसबुक तसेच विविध समाज माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.
हे शारदे वीणावती – असे या भावकाव्याचे बोल आहेत . सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांनी हे काव्य संगीतबद्ध केले असून बाॅस्टन, अमेरिका येथे वास्तव्य असलेल्या गायिका अनुराधा पालकुर्ति जुजू यांनी ही सरस्वती वंदना गायिली आहे.
जुजू प्राॅडक्शनची ही निर्मिती असून मुंबई येथील प्रसिद्ध संगीतकार कमलेश भडकमकर यांचेसह लंडन येथील राॅयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रातील एकशे एक निष्णात कलावंतांनी भारतीय संगीत साजासह पाश्चिमात्य साज या गाण्याला चढवला असून जगविख्यात लंडन येथीलच सुप्रसिद्ध आयकाॅनिक ॲबी रोड स्टुडिओत या गीताचे ध्वनीमुद्रण संपन्न झाले. ॲबी रोड स्टुडिओत ध्वनीमुद्रण झालेले सरस्वती मातेचे हे पहिलेच भारतीय गीत असू शकते आणि या सन्मानाचे प्रथम मानकरी वैदर्भीय कवी गीतकार प्रा अरुण सांगोळे ठरलेत हे विशेष!
या गाण्याला कोरस म्हणून वेदांत यादव, अद्वैत जोशी,स्वरा भिडे शरण्य साखरदंडे ,गाथा भावकर, मुद्रा सावंत यांचा स्वर लाभला. या गीताच्या कोरसचे ध्वनीमुद्रण एशियन म्युझिक व्हिजन , मुंबई येथे अवधूत वाडकर यांनी केले. सुस्मिरता डवलकर आणि सावनी भट यांनी कोरसचे संयोजन केले. मिक्स आणि मास्टरिंग मुंबई येथील यशराज स्टुडिओत विजय दयाल यांनी केले. या गाण्याच्या व्हिडिओसाठी गायिका अनुराधा जुजू यांचे विद्यार्थीगण प्रेंशी चामलिया, आर्या,रोहन गुप्ता , माया आणि मीरा थडुरी यांचा सहभाग आहे. सीईओ प्रशांत पलकुरथी आणि सीओओ बाप्पा लाहिरी या दोघांच्या प्राॅडक्शन टीमने या गाण्याची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळली. जुजू प्राॅडक्शन, बोस्टन यांची ही भव्यदिव्य कलाकृती युट्यूबच्या माध्यमातून गानरसिकांच्या भेटीला आली असून रसिकवृंदांचा या गाण्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे शारदे वीणावती या गीतातील
कानाशी रुंजी घालणारी भाव रम्य शब्दकळा, संगीत आणि गायन यामुळे परत परत ऐकायला भाग पाडणारी ही भावशब्दकळा मनाला मोहित करून टाकणारी आहे. गान रसिकांचा या गाण्याच्या पसंतीला उदंड प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रातील मराठीच नव्हे तर इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे गीत प्रेरणादायी ठरेल इतपत सर्वांगसुंदर अशी ही रचना झाली आहे.
आजचे आघाडीचे संगीतकार कमलेश भडकमकर यांची आकर्षक संगीतचाल आणि गुरू विदुषी आरती अंकलीकर यांच्या शिष्या गायिका अनुराधा पालकुर्ति जुजू यांनी गायिलेले हे पहिलेच मराठी गीत असून त्यांच्या कर्णप्रिय सुरांनी या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. अनुराधा पालकुर्ति, प्रशांत पालकुर्ति आणि प्रख्यात संगीतकार कमलेश भडकमकर यांच्यामुळे देश विदेश पातळीवर ही संधी प्राप्त झाल्याची भावना कवी अरुण सांगोळे यांनी सदर प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.