शिरूर अनंतपाळ (Latur):- शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) तालुक्यातील साकोळ येथे गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि साकोळकरांच्या जीवनाशी कायम खेळ करणाऱ्या व्हिक्टोरिया अग्रोफुड प्रोसेसिंग प्रा.लिमिटेड कारखान्यामुळे साकोळ व परिसरातील नागरिकांचे आरोग्य (Health) धोक्यात आले आहे. या कारखान्यातून(Factories) सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे जलप्रदूषण(Water pollution) होत असून यामुळे पशुधनासह पक्षी व जलचरांवरही संकट आले आहे.
व्हिक्टोरिया अॅग्रोफुड प्रोसेसिंग हा शिरुर तालुक्यातील एकमेव कारखाना
व्हिक्टोरिया अॅग्रोफुड प्रोसेसिंग हा शिरुर तालुक्यातील एकमेव कारखाना आहे. या कारखान्याची निर्मिती झाल्यापासून ते आजपर्यंत कारखान्यामुळे साकोळवासीयांना कधी सुख लाभलेले नाही. जेव्हापासून कारखान्याची निर्मिती झाली तेव्हापासून साकोळकरांच्या जीवात जीव नाही.
कारखान्याला दोन दशक लोटली जात आहेत. या कारखान्याच्या दुषित पाण्यामुळे परिसरातील नागरीक, प्राणी, पशुपक्षी, परेशान झालेले असून या दुषित पाण्याचा प्रवाह साकोळच्या लेंडी नदीत जात असल्यामुळे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही प्राणी, पशुपक्षी, जनावरे, या पाण्याने दगावण्याची भिती निर्माण झालेली आहे.
ग्रामपंचायतीचा कारवाईचा इशारा
गेल्या वर्षी याच दुषित पाण्याणे लेंडी नदीवरील तसेच घरणी नदीवरील मासे, बगळे, कावळे, तर साकोळ येथील काही शेतक-यांचे पशुधन नष्ट झाले होते. तरी शासनाच्या संबंधित विभागांकडून कारखान्यातील दुषित पाण्याची विल्हेवाट तात्काळ नाही लावल्यास कारवाईचा इशारा साकोळ ग्रामपंचायतीने कारखाना प्रशासनाला दिला आहे.