यासाठी आज पोहरादेवी येथे भोग आरदास व प्रार्थना
देवी-सेवा-बापू भक्तांसह समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
मानोरा (Sanjay Rathod) : बंजारा समाजाचे नेतृत्व माजी मंत्री लोकनेते आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी आज रविवार दि. ८ डिसेंबरला सकाळी ११. ३० वाजता बंजारा समाज संत सेवालाल महाराज मंदिर पोहरादेवी येथे भोग लावून अरदास रूपाने प्रार्थना करणार आहेत. तरी देवी जगदंबा माता, सेवा – बापू भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बंजारा समाज समन्वय समिति महाराष्ट्र यांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पोहरादेवीचा न भूतो न भविष्यती असा कायापालट करणारे बंजारा समाजाचे नेतृत्व तत्कालीन पालकमंत्री आ. संजय राठोड यांनी समाजाच्या विकासासाठी जेव्हा -जेव्हा आवाज दिला. तेव्हा -तेव्हा समाज बांधव एका ध्वजाखाली एकवटला हे साऱ्या देशातील जनतेला माहिती आहे. शेकडो वर्षापासून विकासापासून दूर राहिलेल्या पोहरादेवी या बंजारा काशीचा विकास करण्याचे रामराव बापूंना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सन २०१८ पासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत, झटत ७०० कोटीच्या वर निधी मंजूर करवून घेतला. आणि बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरागड व उमरीगडचा कायापालट केला. त्यामुळे त्यांच्या पाठीशी बंजारा समाज बांधव प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहीला आहे.
समाजाला एकवटून एका ध्वजाखाली आणण्याची ताकद केवळ त्यांच्यात आहे. आणि तसा आशीर्वादही परमपूज्य संत रामराव बापू यांनी त्यांना दिलेला आहे. त्यामुळेच बंजारा समाजाच्या आशेचा किरण, आन – बान आणि शान असलेल्या कुशल नेतृत्वाला महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारमधे मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी रविवारलाvपोहरादेवी येथे भोग व अरदास कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. तरी देवी – सेवा – बापू भक्त समाजबांधव व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
समाज बांधवांनी आपल्या सोयीने स्वयंस्फूर्तीने आज रविवारी सकाळी ११. ०० वाजता नंगारा म्युझियम जवळ एकत्रित व्हावे, नंगारा म्युझियम ते मंदिर परिसरापर्यंत भव्य पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन सामुहिक भोग अरदास रूपी प्रार्थना, लेंगी पथकाचे नृत्य सादरीकरण त्यानंतर देवी व संतांचा दर्शन सोहळा पार पडणार आहे. असे बंजारा समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.