प्रार्थना रॅलीला समाजबांधवांचा उत्सफुर्त प्रतिसाद
गोर बंजारा समाज बांधव व समर्थकांची संतापुढे नतमस्तक
पोहरादेवी येथे भोग आरदास व प्रार्थना
मानोरा (Sanjay Rathod) : बंजारा समाजाचे नेतृत्व माजी मंत्री लोकनेते आमदार संजय राठोड यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी रविवारी दि. ८ डिसेंबरला गोर बंजारा समाज बांधवांच्या वतीने दिग्रस ते पोहरादेवी प्रार्थना रॅली काढण्यात आली. तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदीरात भोग लावून आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात समावेश व्हावा, याकरिता आरदास रूपाने प्रार्थना करण्यात आली . यावेळी महंत, देवी जगदंबा माता, सेवा – बापू भक्त नायक, कारभारी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच व बंजारा समाज समन्वय समिति महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोहरादेवीचा न भूतो न भविष्यती असा कायापालट करणारे बंजारा समाजाचे नेतृत्व तत्कालीन पालकमंत्री आ. संजय राठोड यांनी समाजाच्या विकासासाठी जेव्हा -जेव्हा आवाज दिला. तेव्हा -तेव्हा समाज बांधव एका ध्वजाखाली एकवटला हे साऱ्या देशातील जनतेला माहिती आहे. शेकडो वर्षापासून विकासापासून दूर राहिलेल्या पोहरादेवी या बंजारा काशीचा विकास करण्याचे रामराव बापूंना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सन २०१८ पासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत, झटत ७०० कोटीच्या वर निधी मंजूर करवून घेतला.
बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरागड व उमरीगडचा कायापालट केला. त्यामुळे त्यांच्या पाठीशी बंजारा समाज बांधव प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहीला आहे. समाजाला एकवटून एका ध्वजाखाली आणण्याची ताकद केवळ त्यांच्यात आहे. आणि तसा आशीर्वादही परमपूज्य संत रामराव बापू यांनी त्यांना दिलेला आहे. त्यामुळेच बंजारा समाजाच्या आशेचा किरण, आन – बान आणि शान असलेल्या कुशल नेतृत्वाला महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारमधे मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी रविवारला पोहरादेवी येथे भोग व अरदास कार्यक्रम हजारो समाजबांधव देवी – सेवा – बापू भक्त व समर्थक यांच्या उपस्थित मोठया उत्साहात पार पडला.
दिग्रस ते पोहरादेवी निघालेल्या प्रार्थना रॅलीत हजारो गोर बंजारा समाज बांधव नंगारा म्युझियम जवळ जमला. येथून मंदिर परिसरापर्यंत भव्य पायी दिंडीचे रॅली काढण्यात आली. सामुहिक भोग अरदास रूपी प्रार्थना, लेंगी पथकाचे नृत्य सादरीकरण त्यानंतर देवी व संतांचा दर्शन सोहळा पार पडला. प्रार्थना रॅलीद्वारे समाजबांधवांनी आमदार संजय राठोड यांचा बॅनर हातात घेऊन संत सेवालाल महाराज की जय, संत रामराव बापू की जय असा जयघोष करून मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची मागणी केली.