लातूर(Latur) :- सोयाबीन शेतीनंतर सर्वाधिक उत्पादन असलेल्या ऊस(sugar cane) शेतीला यंदा सतत होणाऱ्या पावसाने फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या के- 86032 या जातीच्या उसाला पांढऱ्या मातीचे गोंगरान झोंबले असून या जातीचा उभा ऊस लालभडक झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले असून ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे.
उसाला पांढऱ्या मातीचे गोंगरान झोंबले असून या जातीचा उभा ऊस लालभडक झाला आहे.
एकेकाळी उसाचे मोठे क्षेत्र असलेले लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात ऊस क्षेत्र घटले आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ऊस शेती करण्यावर भर दिला आहे. लातूर जिल्ह्यात यंदा जवळपास 50 हजार हेक्टरवर ऊस शेती केली जाते. जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी बरोबरच काही खाजगी कारखानेही ऊस गाळप करीत असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत मार्केट यातून उपलब्ध झाले आहे. समाधानकारक भाव नसला तरीही उसाचा पैसा एकमुस्त येत असल्याने त्याचा आपल्या संसारीक बाबींमध्ये चांगला उपयोग होतो, हे जाणून शेतकरी या शेतीवर अवलंबून आहेत. असे असले तरी यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ऊस शेती गोंगावली आहे. अनेक उभ्या फडांमध्ये विशेषतः के- 86032 या जातीच्या ऊस फडावर पांढऱ्या माशीने हल्ला चढविला आहे.
उसाच्या पानातून रस शोषून घेणाऱ्या या पांढऱ्या माशीमुळे उसाची पाने लाल भडक पडली
जिल्ह्यात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र 86032 या उसाचेच आहे. उसाच्या पानातून रस शोषून घेणाऱ्या या पांढऱ्या माशीमुळे उसाची पाने लाल भडक पडली आहेत. परिणामी उसाच्या कांड्यामध्ये रस भरणे कठीण होणार असून यापुढील काळात या उसाची वाढही खुंटण्याची भिती आहे. त्यातच सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक फडांमध्ये जमिनीचा वापसा होत नाही. वापसा झाला असला तरी पांढरीमाशी आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना आता उसाच्या उंचीमुळे प्रतिबंधात्मक फवारणीही करणे जोखमीचे झाले आहे. परिणामी उसाचा फड लालभडक झाला असून उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.