हिंगोली(Hingoli):- तालुक्यातील माळसेलू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मद्यधुंद (Drunk) अवस्थेमध्ये शिक्षकाला येणे चांगलेच महागात पडले असून जिल्हा परिषद (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी १० सप्टेंबरला त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.
जि.प.सिईओ नेहा भोसले यांनी काढले निलंबनाचे आदेश
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील माळसेलू जिल्हा परिषद शाळेमधील गजानन वडकुते हे शिक्षक ९ सप्टेंबर सोमवार रोजी मद्यधुंद अवस्थेमध्ये शाळेमध्ये आले होते. याच दरम्यान एका ग्रामस्थासोबत शिवीगाळीचाही प्रकार घडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल झाला होता. सदर शिक्षक शाळेत आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याने कधी दारू पिल्याची कबुली दिली तर कधी आपण दारू पिलोच नाही, असे सांगत हातवारेही केले. अशा प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकार्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार गटशिक्षण अधिकारी नितीन नेटके यांनी सविस्तर अहवाल सादर केला. त्यात ग्रामस्थांचे म्हणणे व छायाचित्रीकरणही सोबत जोडले होते.
त्यानुसार शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के शिक्षक वडकुते यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी शिक्षक गजानन वडकुते यांच्या निलंबनाचे आदेश १० सप्टेंबर रोजी काढले. त्यामुळे गुरूजीना मद्य प्राशन करून विद्येच्या मंदिरात येणे महागात पडले असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. या प्रकारामुळे मात्र शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.