गुरुपौर्णिमेला महानोरांना सदानंद देशमुखांनी केली अर्पण शब्ददक्षिणा !
बुलढाणा (Gurupurnima) :
या नभाने या भुईला दान द्यावे,
अन् इथल्या मातीतून चैतन्य गावे..
कोणती पुण्ये येती अशी फळाला,
की जोंधळ्याला चांदणे लखडून जावे !
रानकवी ना. धो. महानोर अन्
जसा येणार बहर तसा जाणार झडून,
गळणाऱ्या पाण्यासाठी काय फायदा रडून..
काय फायदा रडून जिणं हसत जगावं,
अन् मातीच्या कुशीत सोन होऊन उगावं !
ही कविता लिहिणारे प्रा.सदानंद देशमुख यांच्यात गुरु-शिष्याचं नातं, याच नात्याला वांङमयीन पटलावर आणले ते.. डॉ. गजेंद्र निकम व वैशाली निकम या दाम्पत्यांनी, औचित्य होते गुरुपौर्णिमेचे (Gurupurnima) ! साहित्य अकादमी प्राप्त बारोमासकार डॉ. सदानंद देशमुख (Sadananda Deshmukh) व त्यांचे गुरू ना. धो. महानोर यांच्यातील गुरू-शिष्याच्या नात्यातील उलगडा “रानभूल” या कार्यक्रमातून रविवार.२१ जुलै करण्यात आला. यावेळी शायर डॉ. गणेश गायकवाड व डॉ. गजेंद्र निकम यांनी विविध प्रश्न विचारत त्यांना बोलते केले.
यावेळी सर्वप्रथम आपले गुरू ना.धों.च्या आठवणींना उजाळा देतांना डॉ.सदानंद देशमुख यांनी ना. धो. महानोर यांच्या कवीतांनी प्रभावीत होऊनच ते साहित्याकडे आकर्षित झाल्याचे सांगितले. पुढे महानोरांच्या प्रथम भेटीत सकस साहित्यनिर्मिती करण्यासाठी शिक्षण सुरू ठेवत भरपूर वाचन करून आपले अनुभव प्रगल्भ करण्याचा गुरूमंञ बारावीनंतर माझे बंद पडलेले शिक्षण पून्हा सूरू होण्यास कारणीभूत ठरल्याचे त्यांनी सांगितले. आज लेखक म्हणून जो सदानंद देशमुख (Sadananda Deshmukh) आपणासमोर उभा आहे, त्यामागे ना. धों. महानोर यांनी मला मानसपुत्र मानून वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचे हे फलीत असल्याची कृतज्ञता त्यांनी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर व्यक्त केली.
यावेळी तासभर चाललेल्या गप्पांच्या ओघात ना. धों. च्या काही आशय गर्भ कविता ही प्रा. देशमुखांनी सादर केल्या. माझ्या ग्रामीण वास्तवाचे चिञण करणाऱ्या साहित्याला साहित्य अकादमी सारखा पुरस्कार प्राप्त होणे किंवा महाराष्ट्रभर अनेक विद्यापीठांमध्ये हे साहित्य अभ्यासले जाणे, हा माझा गौरव नसून शेती-मातीत राबणाऱ्या पुर्वजांची पुण्याई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Gurupurnima) गावगाड्यात राबणाऱ्या शेतकरी, शेतमजूरांची वेदना माझ्या शब्दांमधून अंकुरली व ती वैश्विक झाली. कारण त्यामध्ये बेगडी कृञीमता नाही तर नागडा अस्सलपणा आहे. तो शेतीमालाच्या अनुभवातून आलेला असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले. लेखकांच्या मिळकतीच्या प्रश्नावर व्यक्त होतांना त्यांनी
कधीकाळी चिमण्यांना दाणे टाकलेले,
भिरीभिरी पाखरांचे पंख दारी आले,
दूरदूरच्या देशीचे अनोळखी कोणी,
माझ्या शब्दापाशी घर बांधूनीया गेले. !
असे सांगत आयुष्यात जोडली गेलेली माणसे हीच आपली खरी संपत्ती असल्याचे शेवटी सांगीतले. यावेळी निवृत्त कर्नल सूहास जतकर, डॉ. वैशाली निकम, गायञी सावजी, चंद्रशेखर जोशी, रविकिरण टाकळकर, रविंद्र साळवे यांच्यासह अनेक रसिकांची उपस्थिती होती.