उदगीर (Latur):- उदगीर लातूर रोडवर पोलिसांनी(Police) दोन कारमधून जाणारा ११ लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील तिघांना पोलिसांनी गजाआड केले. दोन कारसह गुटखा जप्त केला.
दोन कारसह तिघांना केले गजाआड!
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डिग्रस पाटीजवळ एम.एच.०३ बीसी १५९८ या क्रमांकाची कार व एम.एच १४ सीएस ८९३४ या दोन पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये ११ लाखांच्या गुटख्याची वाहतूक करीत असल्याची कुणकुण उदगीर ग्रामीण पोलिसांना लागली. पोलिसांनी सापळा लावून दोन कार पकडल्या. त्यात ११ लाखांचा गुटखा होता, तो व ७ लाखांच्या दोन कारसह एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उदगीर लातूर रोडवर दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखुजन्य गुटखा आरोपीने संगनमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन (Drug Administration)महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक आसुमा अ/४९६/७ दिनांक १८ जुलै २०२३ याची माहिती असूनही कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल (Police Head Constable) राम विश्वभंर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रहेमत अली कटुमिया सय्यद राहणार मलकापूर ता. परळी जि. बीड, आबेद सालार शेख बरकतनगर परळी, जि. बीड, फेरोज लतीफ अब्दुल मिलिंदनगर परळी जि. बीड यांच्यावर गुरनं. ३५३/२४ कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ भादंवि प्रमाणे २४ जून रोज सोमवारी पाच वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.