काँग्रेस कार्यकर्त्यांकडून महाशिवरात्रीच्या “संतोष”जनक शुभेच्छा!
बुलढाणा (Mahashivratri) : नेत्यांच्या भांडणात पिचला जातो तो, कार्यकर्ता.. तिकडे शिवसेनेत खासदार-आमदाराच्या भांडणात शिवसैनिकांची अशीच फरपट चालू असताना, काँग्रेस पक्षातही तीच “गत” फार पूर्वीपासून असल्याने हा पक्ष “गतप्राण” होण्याचे उंबरठ्यावर आला होता. त्यातल्या त्यात हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपद मिळताच वासनिकांचे कट्टर समर्थक विजय अंभोरे यांनी थेट पक्षच सोडल्यामुळे, आता अजूनही काही वासनिकप्रेमी पक्षाबाहेर जाऊ शकतात ? अशा चर्चा सुरू झाल्या असताना.. कोलवडच्या महाशिवरात्र यात्रेत लागलेले एक बॅनर मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी हायसे वाटणारे आहे.
या बॅनरवर संतोष पाटील या काँग्रेस कार्यकर्त्याने बंटीदादा अर्थात हर्षवर्धन सपकाळ व संजूदादा अर्थात संजय राठोड या दोन नेत्यांना एकत्र आणल्याने, एक पॉझिटिव्ह संदेश ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. मात्र बॅनरवर एकत्र आणलेले हे दोन नेते, खरोखर एकत्र येतील का ? हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे !
आज महाशिवरात्र (Mahashivratri) , कोलवड येथे श्रीक्षेत्र महादेव मंदिरावर भव्य यात्रा भरते. जिल्हा मुख्यालय बुलढाणाजवळ असलेले हे सर्वात जवळचे शिवतीर्थ. त्यामुळे शहरातील शिवभक्तांची मोठी गर्दी या मंदिर परिसरात असते, या शिवतीर्थवर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
“छावा” संघटनेच्या काळात याच यात्रेदरम्यान एकदा तत्कालीन आमदार विजयराज शिंदे व संजय गायकवाड समर्थकांमध्ये मोठा राजकीय वाद उफाळला होता. ती वादाची पार्श्वभूमी या यात्रेला असताना, काँग्रेसने मात्र या यात्रेत आता संवादाची पृष्ठभूमी तयार केली आहे. “निवांत” व्यक्तिमत्व संतोष पाटील यांनी या यात्रेत महाशिवरात्रीच्या शुभेच्छाचे “लक्षवेधी” बॅनर लावले असून, या बॅनरवर हर्षवर्धन सपकाळ व संजय राठोड यांना एकत्र आणले आहे.. त्यामुळे (Mahashivratri) बॅनरची चर्चा कोलवडसह बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या राजकीय पटलावर होत आहे !