राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये ‘हॅपी सॅटरडे..’
बुलढाणा (Happy Saturday) : कलेमुळे जीवनाला समृध्दता येते. कलेमुळे स्वतः ला व इतरांना आनंद देता येतो. विद्यार्थ्यांसाठी तर कला वरदान आहे. तणावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक तरी कला आत्मसात करावी, असे आवाहन नाट्य कलावंत व लेखक तथा अक्षरदेह नाट्यकला संस्थेचे अध्यक्ष (Shashikant Ingle) शशिकांत इंगळे यांनी येथे केले.
येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्यावतीने (Rajiv Gandhi Military School) विद्यार्थ्यांसाठी आयोजित आनंदी शनिवार उपक्रमात ३ ऑगस्ट रोजी “मानवी जीवनात कलेचे महत्व” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या अध्यक्षा विद्याताई माळी या होत्या. संस्थेच्या सदस्या डॉ. केतकी माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पडघान, उपप्राचार्य शैलेश वारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्राचार्य रवींद्र पडघान यांच्याहस्ते शशिकांत इंगळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना इंगळे (Shashikant Ingle) यांनी विविध कलांचा व कलावंतांचा इतिहास तसेच कलेमुळे जीवनात घडणारे बदल याविषयी माहिती दिली. यावेळी नाट्य अभिनयाचे सादरीकरणही त्यांनी केले.
राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये (Rajiv Gandhi Military School) शाळा समितीच्या अध्यक्षा विद्याताई माळी यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शाळेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. अभ्यासासोबत व्यक्तीमत्व विकास, समूह विकास, नेतृत्व गुणांची वृध्दी, पर्यावरणाशी मैत्री व कलागुणांचे संस्कार यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे विद्याताई माळी यांनी सांगितले. प्रास्ताविकात उपप्राचार्य शैलेश वारे यांनी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत व स्पर्धेत मिळविलेल्या यशाची तसेच डॉक्टर्स, इंजिनिअर्स झालेल्या, सैनिकी सेवेतील, प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी झालेल्या व विविध क्षेत्रात लौकीक मिळवणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती दिली. सूत्रसंचालन सहा. शिक्षक दीपक बढे यांनी केले तर प्राचार्य रवींद्र पडघान यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सहा. शिक्षक प्रशांतकुमार डोमळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.