परभणी (Parbhani):- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital)वृद्ध दांपत्यास कानाची मशीन घेऊन देतो म्हणत त्यांच्याकडून तीनशे रुपये घेत फसवणूक केली. फसवणूक(Fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध दांपत्य रडत बसल्याने तेथीलच एका एमएसएफ जवानाने त्यांची विचारपूस करून फसवणूक करणार्या युवकास पकडून त्यांना चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील घटना गुरुवार १६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
वृद्ध दांपत्यास कानाची मशीन घेऊन देतो म्हणत फसवणूक
तालुक्यातील रावराजुर येथील खबुतराबाई चिंतामण काळे व चिंतामण आजा काळे,(वय ७६) हे वृद्ध दाम्पत्य जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवार १६ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आले होते. यातील खबुतराबाई काळे यांना कानाने ऐकू येत नसल्याने त्यांना कानाची मशीन घ्यावयाची होती. त्या सकाळपासून रुग्णालयात फिरत असल्याचे दोन युवकांनी त्यांना पाहिले. त्या युवकांनी त्यांची विचारपूस करून “तुम्हाला कानाची मशीन (ear machine) मी घेऊन देतो” तुमच्याकडे असलेले सर्व पैसे मला द्या असे म्हटले . त्यावर खबुतराबाई यांनी त्यांच्या जवळील ३०० रुपये काढून त्या युवकास दिले. ते पैसे घेत त्या युवकांनी तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ते दाम्पत्य रुग्णालय आवारात रडत बसले होते.
हे पाहताच या ठिकाणी तेथील एमएसएफ जवान तुकाराम बुरफुले यांनी त्या वृद्ध दांपत्यास रडण्याचे कारण विचारले वृद्ध दांपत्याने घडलेला प्रकार व त्या युवकाचे वर्णन बुरफुले यांना सांगितल्यानंतर बुरफुले यांनी तात्काळ त्या युवकास रुग्णालयाच्या आवारातच पकडले. त्यानंतर त्या दोन्ही युवकांना रुग्णालय पोलीस चौकीतील पोलिसांच्या हवाली केले. रुग्णालयातील पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ त्या दोन्ही युवकांस पोलीस ठाण्यात नेले. वृत्तलिहीपर्यंत त्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता.