परभणी/सेलू (Parbhani):- पती- पत्नी कामासाठी शेतात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन ४७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १ डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान सेलू तालुक्यातील धनेगाव येथे घडली. सदर प्रकरणी अनोळखी चोरट्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराच्या मेन गेटचे कुलूप तुटलेले दिसले
विष्णू उत्तमराव कटारे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नी रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घराला कुलूप लावून शेतामध्ये कामाला गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते घरी परत आले. यावेळी त्यांना घराच्या मेन गेटचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच दरवाजा उघडा होता. आत जावून पाहणी केल्यावर सोन्या- चांदीचे दागिने (Gold and silver jewellery) आणि रोख २० हजार रुपये मिळून ४७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती सेलू पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे. सेलू पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसापासून सेलू शहर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.