(Health) आजकाल “हेल्थ कॉन्शीयसनेस” (Health) अर्थात आरोग्याप्रति जागरूक असणे या गोष्टीचा इतका अतिरेक झाला आहे की ही अतिजागरुकता आता आरोग्य (Health) बिघडवण्याची पहिली आणि सर्वसमावेशक पायरी ठरते आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य (Health) सांभाळणे याविषयी बऱ्यापैकी प्रयत्न बरेचजण करीत असतात आणि या सर्व आरोग्य (Health) सांभाळून ठेवण्याच्या कसरती सुरु ठेवण्यासाठी विविध आरोग्य तज्ज्ञ (Health Experts) यांचे लेख म्हणा, दृकश्राव्य माध्यमातील मार्गदर्शन म्हणा; हे सर्वजण शोधण्याचा प्रयत्न करीत असतात.
सुदृढ आरोग्यासाठी..
बरं, सुदृढ आरोग्य (Good Health) सर्वांनाचा हवे असते आणि ते सहज आणि सोप्या गोष्टी करून साध्य करण्याची एक लालसा सुद्धा प्रत्येक “सो कॉल्ड हेल्थ कॉनशियस” व्यक्तीमध्ये असतेच असते आणि मग याच गोष्टीचा फायदा उचलणारे आरोग्य मार्गदर्शक सध्या गल्लोगल्ली तयार होत आहेत. हे सर्व आरोग्य मार्गदर्शक आपल्या क्षेत्रात आपणच कसे तज्ञ आहोत, हे दाखविण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरविण्यात तरबेज असतात; त्यामुळे यांच्या मार्गदर्शनाचे अनुसरन करणारे “अतिआरोग्य जागरूक नागरिक” मात्र आपलं असलेलं आरोग्य (Health) सुद्धा घालवून बसतात; असे बरेच उदाहरणं मागच्या काळात आपल्यासमोर येऊन गेले आहेत. मागे पुण्यात एका सुदृढ व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याचे ज्यूस प्यायले, ज्यामुळे त्याचा विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू ओढावला. असेच कुण्या आरोग्य तज्ज्ञाच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीने तो प्रयोग केला आणि आपलं जीवन गमावून बसला. सध्या कुणी आरोग्यतज्ञ सांगतो, दिवसातून एकदाच जेवण करा, तर दुसरा सांगतो, थोडं थोडं ठराविक वेळेनंतर खात राहिल्यास आपलं आरोग्य उत्तम राहील..
स्वयंघोषित डॉक्टर
कुणी सांगते सकाळी कोमट पाणी प्या, कुणी सांगते थंड प्या! बिचारे सर्वासामान्य आरोग्याप्रति जागरुक नागरिक मात्र खूप गोंधळून गेलेले असतात. नेमकं कोणाचं ऐकून आपलं आरोग्य चांगलं राहील, या चिंतेत त्यांचेच आरोग्य बिघडण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. बरं काही आरोग्यतज्ञ स्वयंघोषित डॉक्टर झाले आहेत, त्यांचा आणि प्रचलित आरोग्य शिक्षणाचा अजिबात संबंध आलेला नसतो, तरी ते सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांनासुद्धा आपल्या वाक्चातुर्याने चूप करतात. अशा वेळी सर्वसामान्य जनतासुद्धा त्या तथाकथित आरोग्यमार्गदर्शकाच्या प्रभावाखाली झपट्याने ओढले जातात आणि त्यांच्या तर्कहिन किंवा कुठलाही शास्त्रीय आधार नसलेल्या आरोग्य पद्धती वापरून आपले आरोग्य बिघडवतात.
व्यापक जनजागृतीची गरज
मला वाटते या संदर्भात व्यापक जनजागृतीची गरज आहे. लोंकाना शास्त्रशुद्ध पद्धतीने आरोग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अमुक एखादे औषध किंवा जीवनशैलीची (Lifestyle) पद्धत दुसऱ्या व्यक्तीला उपयोगी पडेलच असं नसतं, हेसुद्धा लोकांना पटवून द्यावं लागेल; अन्यथा आरोग्याविषयीची अतिजागरूकता जनतेचे आरोग्य असेच बिघडवत राहील!
लेखक : डॉ. भास्कर गो. मापारी (BHMS),
लोणार, जि. बुलडाणा
(प्रस्तुत लेखक यांनी बुलढाणा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचे अशासकीय सदस्य म्हणून कार्य केलेले आहे)