गोंदिया (Gondia):- शहरात आज, (ता.४) सकाळी फुलचुर नाका परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीला अचानक आग लागली. आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. परिसर मुख्य रस्त्याला लागून असून घटना सकाळदरम्यान असल्याने मोठे अनर्थ टळले. या घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.
जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान
गोंदिया-गोरेगाव मार्गावर फुलचुर टोलनाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून याठिकाणी फर्निचर करिता वापरण्यात येणारे केमिकल, पॉलीश आदी साहित्य असल्याचे सांगितले जात आहे. शॉटसर्किटमुळे ही आग (Fire due to short circuit)लागली असावी अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. बजाज यांच्या मते यात त्यांचे जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान(damage) झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी फूल तोडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना कंपनीतून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. याची माहिती त्यांनी बजाज यांना दिली त्यांनी कंपनीकडे धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रयत्नात एक युवकही किरकोळ भाजल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे (fire brigade) चार बंब व पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
अग्निशमन दिनाच्या दिवशीच घडली घटना
४ मे सर्वत्र आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करण्यात येत असून योगायोगाने आजच्याच दिवशी ही घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असताना इमारतीलाही नुकसान पोहचले आहे.
अन् अनर्थ टळला…
गोंदिया-गोरेगाव महामार्ग राज्य महामार्ग आहे. यामुळे मोठी वर्दळ असते. त्यातच आज, अचानक केमिकल फॅक्ट्रीला आग लागली. लागलेल्या आगीत कंपनीच्या शेजारीच मोकळ्या जागेत वीज वितरण कंपनीचे रोहित्र व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. आग आटोक्यात आल्याने हे साहित्य विशेषतः रोहित्र थोडक्यात बचावले. अन्यथा मोठा स्फोट होऊन अनर्थ घडला असता अशा चर्चा लोकांमध्ये सुरू होती.