परभणी/ पाथरी (Parbhani):- मृग नक्षत्राच्या सुरुवाती पासूनच वरूणराजाने बळीराजावर कृपादृष्टी दाखवली असून पाथरी तालुक्यामध्ये सर्व दूर जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा आता पेरता झाला आहे. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने (rain) तालुक्यातील वड्या नाल्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हवामान खात्याचा यंदा सरासरी इतका पाऊस राहील असा अंदाज
भारतीय हवामान खात्याने(Department of Meteorology) यंदा सरासरी इतका पाऊस राहील असा अंदाज दिल्यानंतर तो मृग नक्षत्रापासूनच खरा होताना दिसत आहे. १ जून ते ११ जुन पर्यंत ५ दिवस पावसाचे झाले आहेत. पाथरी तालुक्यामध्ये जून महिन्याच्या या अकरा दिवसांमध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरासरी पेक्षा यंदा विक्रमी म्हणजे १४० टक्के एवढा समाधानकारक पाऊस पडला आहे. मंगळवार ११ जून रोजी सकाळी तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये असणाऱ्या पर्जन्यमापकांनी घेतलेल्या नोंदीनुसार पाथरी महसूल मंडळामध्ये ४०.८ मिमी बाभळगाव महसूल मंडळामध्ये ६० .५ मिमी, हादगाव महसूल मंडळामध्ये ४१.८ किमी तर कासापुरी महसूल मंडळामध्ये २२.८ मिमी एवढा पाऊस पडला आहे.
वेळेवर पाऊस झाल्यामुळे कापसाचे व मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
पाथरी तालुक्यामध्ये ४९हजार ५९८ पेरणी व लागवड योग्य क्षेत्र असून यापैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक असल्याने ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या होणार आहेत. यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे कापसाचे व मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. तर कापूस लागवडी पाठोपाठ सोयाबीन पेरणीचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे (soybeans) घसरलेले दर ही सोयाबीन पेरणी कमी राहण्यास कारणीभूत ठरणार आहेत.