हिंगोली(Hingoli):- पावसाळ्यामधील पहिलाच जोरदार पाऊस मंगळवारी रात्रीच्या सुमारास झाला. मागील चोवीस तासात सरासरी २८.७० मि.मी. पाऊस झाला असून हिंगोली तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
ओढ्यांना प्रथमच वाहते पाणी; काही ठिकाणी नद्यांचे पात्रही पाण्याने भरले
जून महिन्यात मृग नक्षत्र लागला. त्यातच ११ जून मंगळवार रोजी रात्रीच्या सुमारास जिल्हाभरात पावसाळ्यातील पहिलाच जोरदार पाऊस(rain) काही वेळ बरसला. परिणामी नदी, नाले, ओढ्यांना प्रथमच वाहते पाणी आले. काही ठिकाणी नद्यांचे पात्रही पाण्याने भरले. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतकर्यांनी पेरण्यासाठी लगबग सुरू केली आहे. मागील चोवीस तासात हिंगोली जिल्ह्यात २८.७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ज्यामध्ये हिंगोली तालुक्यात ५७.८० मि.मी., औंढा नागनाथ तालुक्यात ३१.५० मि.मी., वसमत तालुक्यात २०.५० मि.मी., सेनगाव तालुक्यात १३.७० मि.मी., कळमनुरी तालुक्यात १७.३० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी (heavy rain) झाली असून त्यात हिंगोली ८६.५ मि.मी., सिरसम, बासंबा, माळहिवरा मंडळात प्रत्येकी ७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकणी झालेल्या जोरदार पावसामुळे एकच धांदल उडून काही ठिकाणी नागरिकांची पळापळ झाली.